आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाकाठी माय मराठी:शब्द दळले कांडले, पीठ अर्थाचे सांडले; नाशिकमधल्या ग्रंथाेत्सवात रंगले निमंत्रित कवींचे संमेलन

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शब्द दळले कांडले

पीठ अर्थाचे सांडले

माय मराठीची माया

ताेंड सायीने माखले...

कवी राजेंद्र उगलेंची ही मराठीची कविता असाे की,

जीवनाला मिळाली

अशी ही दवा

पुस्तकांनी दिला

श्वास जगण्याचा नवा...

घाेषणा हीच द्यावी लागेल उद्या

पुस्तके साठवा, पुस्तके वाचवा...

ही युवा कवी प्रशांत केंदळे यांची कविता असाे... कधी जगण्यावर, कधी शिक्षणावर, कधी प्रेमावर तर कधी बाईपणावर भाष्य करणाऱ्या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. निमित्त हाेते गुरुवारी उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित ग्रंथाेत्सवाचे.

सार्वजनिक वाचनालयाच्या आवारात भरलेल्या ग्रंथाेत्सवातील मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ज्येष्ठ कवी विजयकुमार मिठे यांच्या अध्यक्षेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन पार पडले. यावेळी कवयित्री शुभांगी पाटील बाईपणाचं दु:ख मांडताना म्हणाल्या की,

किती रडल्या, कण्हल्या, किती थकल्या काही जणी

बाईपणाचं दु:ख घेइना हाे काेणी...

तर पाैगंडावस्थेतील प्रेमावर भाष्य करताना राजेश्वर शेळके यांनी

शाळा सुटल्यावर

रस्त्यावरी भेटी ती त्याला

साेडा रस्ता ताई प्लीज

ताे तीला म्हणाला

ही कविता मांडताना मुलीच हल्ली प्रेमासाठी पुढाकार घेतात आणि पुढे काय हाेते, हे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रवींद्र मालुंजकर यांनी शेतकऱ्यांच्या जगण्यावर भाष्य करताना

सारे म्हणती पाेशींदा,

तरी झाेपताे उपाशी

असे वास्तव मांडले. तर गझलकार संजय गाेराडे यांनी

ते दिवस सुगीचे

मचान झाडावरती

मी ढाेल वाजवीत

बसायचाे त्या वरती...

असे म्हणत उपस्थितांना जुन्या आठवणींत घेऊन गेले. विवेक उगलमुगले यांनी तीची वाट ही कविता सादर करताना घरातील मुलगी सासरी गेल्यावरचा प्रसंग मांडला.

तीचे लग्न करून दिले

तेव्हापासून तिला विकले

असंच वाटत राहिलं...

असे त्यांनी मांडले. तर सुरेश पवार यांनी

झालं गेलं साेड विठू

बस थाेडा खाली

बघ तुझ्या वाळवंटी

गर्दी किती झाली....

अशी विठ्ठलाला अाळवणी केली. राजेंद्र साेमवंशी यांनी

जातील संपुनी दु:खे

हा सूर्य नव्याने पाहू

आधार आमचा तुम्ही दादा

फास नका घेऊ...

ही कविता सादर करत शेतकऱ्यांसाठी सकारात्मक संदेश व्यक्त केला. संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे यांनी सुगरण खाेपा ही कविता सादर करत नकळत आपल्याकडून सुगरणीचा खाेपा म्हणजेच तीचे आयुष्यच उद्ध्वस्त झाल्याचे मांडले. या कवीसंमेलनाना रसिकांनी विशेषत: विद्यार्थ्यांची माेठी उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...