आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीपात्रात कपडे व वाहन धुणे सुरूच:प्रदूषणच भरमसाठ गुदमरला गाेदाकाठ

जहीर शेख | नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरीच्या पाण्याचे प्रदूषण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात ‌असले तरी दुसरीकडे गोदावरीचे प्रदूषण रोखण्यात महापालिकेला अद्याप यश आलेले नसल्याचे चित्र डी.बी. स्टारच्या पाहणीत दिसून आले. गोदापात्रात निर्माल्य सोडणे, वाहने धुणे आदी प्रकार सुरूच असून आता सर्रासपणे गोदाकाठावर कपडे धुण्याचे प्रकारही जोरात सुरू असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले. यावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...

नदीपात्रात कचरा, घाण टाकू नये, स्वच्छता राखावी, नदी प्रदूषित करू नये यासाठी पालिका आणि सेवाभावी संस्था प्रबोधन करीत आहेत. काही वर्षापासून गोदापात्रात अनेकदा स्वच्छता मोहीमही राबविली गेली. मात्र, गोदापात्रात कपडे व वाहने धुण्यास सक्त मनाई असतानाही सर्रासपणे हा प्रकार असल्याचे चित्र आहे. सध्या गोदाकाठावर कपडे धुण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. दुतोंड्या मारुतीच्या सांडव्यापासून दक्षिणेच्या भागातील घाटावर महिला सर्रास कपडे धुताना दिसून येत आहेत. स्थानिक महिलांप्रमाणेच बाहेरगावाहून येणारे प्रवासी, भाविकही जुन्या भाजीबाजाराच्या पटांगणाजवळील काठ, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण या भागात कपडे धुताना दिसत आहेत. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून गोदावरीत कचरा टाकणारे, निर्माल्य टाकणारे, कपडे धुणारे, वाहन धुणारे आदींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती.

त्यावेळी गोदावरीचा परिसर अत्यंत स्वच्छ झालेला होता. मात्र, ही दंडात्मक कारवाई आणि येथील शिस्त महापालिकेला फार काळ टिकवता आली नसल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे गोदावरीची अस्वच्छता वाढत गेली. निर्माल्य कलश ठेवलेले असले तरी त्यात निर्माल्य, कचरा टाकण्याऐवजी तो इतरत्रच टाकला जात असल्याचे दिसते. गोदाकाठावर कपडे धुण्यासाठी महिलांची एवढी गर्दी झालेली असताना त्यांना कुणी हटवत नाही.तर सुरक्षारक्षकांनी त्यांना थांबविण्याचे प्रयत्न केले तरी त्यांच्याशी भांडण करत असल्याचे दिसून आले.

गोदाघाटावर ठिकठिकाणी निर्माण झाले ‘धोबीघाट’
रामकुंडावर स्नानानंतर तेथेच कपडे धुण्यात येत असल्याचे आढळले. त्याकडे रक्षकांचे लक्ष गेले तरच त्यांना रोखता येते. अन्यथा कपडे धुणे, कपड्यांसह स्नान केल्यानंतर ते कपडे तसेच रामकुंडात सोडून देणे हे प्रकार सर्रास चालतात. त्यामुळे सफाई करताना कपड्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात निघतो. गोदाघाट हा धोबीघाट बनला आहे. लक्ष्मणकुंड, गांधी तलाव, यशवंतराव पटांगणासमोरील पात्र, रामसेतू पूल व गाडगे महाराज पुलाखालील परिसरात कपडे धुणाऱ्यांची गर्दी असते.

निर्माल्य कलशांची संख्या वाढविण्याची गरज : गोदाघाटावर अनेक ठिकाणी उघड्यावरच कचरा टाकला जात आहे. होळकर पुलावर ठेवलेले निर्माल्य कलश गायब आहेत. त्यामुळे रस्त्यावरच कचरा पडलेला दिसून येतो. संपूर्ण गोदाघाटावर निर्माल्य कलश ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गोदावरी स्वच्छतेकडे दुर्लक्ष : स्मार्ट सिटी अंतर्गत गाेदावरी सुशाेभीकरणाच्या नावाखाली गाेदाकाठ परिसरात काेट्यवधीची विविध कामे केली जात आहेत. मात्र गाेदावरीच्या स्वच्छतेकडे पालिका तसेच स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष हाेत आहे.

पालिकेचे सुरक्षारक्षक व कपडे धुणाऱ्या महिलांमध्ये वाद
गोदापात्रात निर्माल्य सोडणे, दिवे सोडणे, कपडे, वाहने धुणे असे प्रकार सुरू आहेत. येथे तैनात केलेल्या पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी असे करणाऱ्या नागरिकांना अडवले की त्यांचे आणि नागरिकांचे वाद होत असल्याचे डी.बी. स्टारच्या पाहणीत दिसून आलेे. दरराेज सकाळी व सायंकाळी हा प्रकार घडताे.

गोदाघाटावर कपडे धुणाऱ्यांची गर्दी
लक्ष्मणकुंड, गांधी तलाव, यशवंतराव पटांगणासमोरील पात्र, रामसेतू व गाडगे महाराज पुलाखाली परिसर येथे कपडे धुणाऱ्यांची गर्दी असते. - मनीषा कुलकर्णी, नागरिक

कचरा टाकणाऱ्यांना अटकाव करावा
यशवंतराव महाराज मंदिराच्या मागील बाजूला नेहमीच कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. गोदाघाटावर कचरा टाकणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची गरज आहे.- मंदार जानोरकर, नागरिक

वाहने धुणाऱ्यांवर कारवाइॅ करावी
गाडगेमहाराज पुलाच्या दक्षिणेचा भागात भाविक आणि पर्यटक वाहनांची पार्किंग करतात. पार्किंगच्या जागेतच वाहने धुतली जातात. यावर कारवाई करण्यात यावी.- स्वाती जोशी, नागरिक

बातम्या आणखी आहेत...