आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहिवासी त्रस्त:मखमलाबाद काॅलनी रस्त्यांवर खड्डे अन् चिखल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मखमलाबाद परिसरातील श्रीकृष्णनगर, मानकर मळा, राजे छत्रपतीनगर, भगवानबाबानगर, पिंगळेनगर या काॅलनी परिसरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्यात दाेन दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसाने या खड्ड्यांत पाण्याचे तळे साचले असून तेथून मार्ग काढणे आव्हानात्मक ठरत आहे.पावसाळ्यात रस्ता खराब होऊनदेखील मनपा प्रशासनाने दखल न घेतल्याने ही समस्या अद्याप कायम आहे. परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने आता रस्ताही खराब झाल्याने नागरिकांना दुहेरी समस्येचा सामना करावा लागत आहे.

शहरातील जलदगतीने वाढणारा परिसर म्हणून मखमलाबादचा समावेश आहे. परिसरात जाण्यासाठी रस्ते नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना हाल सहन करावे लागले होते. शांतीनगर, गामणे मळा ते मानकर मार्ग मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता झाला नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना चिखलातून शाळेत जावे-यावे लागत होते. गाडी स्लीप होऊन अपघात घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या बेमोसमी पावसाने रस्त्यावर चिखल साचल्याने रस्ता रहदारीसाठी योग्य नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मनपा प्रशासनाने परिसरातील मूलभुत सुविधा द्याव्यात.

निदान रस्ता तरी दुरुस्त करावा
परिसरात अनेक नवीन काॅलन्या निर्माण झाल्या आहेत. कमी दाबाने पाणी येत असल्याने ही समस्या कायम आहे. आता पावसाने रस्तादेखील खराब झाला आहे. मनपाने निदान रस्ता तरी दुरुस्त करावा.- मानसी सागर, रहिवासी

खराब रस्त्यानेे हैराण
कमी दाबाने पाणी येत असल्याने खराब रस्त्याहून बांधकाम ठिकाणां- हून नळी जोडून पाणी घ्यावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात मुलांचे हाल होतात. नगरपालिका प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी.- स्नेहल धनवटे, रहिवासी

अपघातात वाढ
नवीन काॅलनी भागात रस्ते नसल्याने पावसाळ्यात संपर्क तुटतो. विद्यार्थ्यांना चिखलातून शाळेत जावे-यावे लागत होते. दुचाकी चिखलावरून स्लीप होऊन अपघात घडले आहेत. त्यामुळे मार्ग खडतर झाला आहे. तातडीने याची दखल घेतली जावी.- राहुल बोरसे, रहिवासी

बातम्या आणखी आहेत...