आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:युवा साहित्य अकादमीचा ‘देवबाभळी’वर ‘प्राजक्त’ वर्षाव, नाशिकचा नाट्यलेखक प्राजक्त देशमुखच्या नाट्यसंहितेला पुरस्कार जाहीर

नाशिक/पुणे / पीयूष नाशिककर/जयश्री बाेकील21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा पिढीतील नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांना ‘संगीत देवबाभळी’ या नाटकासाठी साहित्य अकादमीचा २०२० सालचा युवा साहित्यिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी ही माहिती दिली. दिलीप प्रभावळकर, आशा बगे आणि लक्ष्मीकांत देशमुख यांच्या समितीने मराठी विभागासाठी समिती सदस्य म्हणून काम पाहिले आणि ‘देवबाभळी’ या नाटकाची शिफारस एकमताने केल्याचे सचिव श्रीनिवासराव यांनी पत्रात म्हटले आहे. ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या युवा लेखकांच्या साहित्यकृतींचा विचार या पुरस्कारासाठी केला जातो. प्राजक्त देशमुख यांचे ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक प्रयोगांच्या दृष्टीनेही घोडदौड करत आहे. केवळ मराठीच नव्हे, तर अमराठी प्रेक्षक आणि कलाकारांनाही या नाटकाने आकृष्ट केले आहे. या नाटकाचे दिग्दर्शनही प्राजक्त यांचेच आहे.

आनंद झाला, पण व्यक्त करायला नाट्यमंदिर बंद : प्राजक्तने व्यक्त केली खंत
आज काय बाेलला विठ्ठलाशी?

काय बाेलणार? पुरस्कार मिळाल्याचा नेहमीप्रमाणे आनंद झालाच. पण इतर पुरस्कारांवेळी जसा हा आनंद रंगभूमीच्या चरणी अर्पण करताे तर या वेळी करू काय? सरकारने आपल्या नाट्यमंदिरांचे टाळे उघडलेच नाहीत. सरकारच्या विचारांचे समर्थन करणाऱ्यांचेही अभिनंदनाचे फाेन आले. त्यांनाही मी आता नाट्यमंदिरं उघडा, आम्हाला नाट्य विठुरायाचं दर्शन घेऊ द्या असेच मी सांगितले. पुरस्कार तर मिळाला पुढे काय? असंही काही जणांनी विचारलं. मी पुढेही नाटकंच लिहिताेय, लिहिलंय. पण, ते सादर करू कुठे? हा पुरस्कार फक्त माझा नाहीये. संपूर्ण देवबाभळी टीमसह कलाकार, रसिकांचा आहे. नाट्यगृहं खुली असती तर आज प. सा. नाट्यगृह, कालिदास कलामंदिराच्या रंगभूमीला माथा टेकला असता. मीच नव्हे तर तमाम रंगकर्मींनी. त्यामुळे फारसे साहित्य म्हणून न बघितल्या गेलेल्या नाटकाच्या संहितेला साहित्य अकादमीने गाैरवलं आहे. हे लक्षात घेऊन तरी सरकारनं नाट्यमंदिरं खुली करावी हेच कळकळीचं साकडं मी विठ्ठलाला घातलं आहे.

नाटकाची संहिता आणि त्याला साहित्याचं मूल्य याबद्दल तू नेहमीच बाेलताेस...
आणि मी हे नेहमीच आग्रहाने मी बाेलत असताे. नाटक हा लेखनप्रकार परफॉर्मिंग आर्ट (सादरीकरणाची कला) म्हणून रुळलेला असल्याने, नाटकाचा एक साहित्यप्रकार म्हणून विचार करून अकादमीने सन्मान करणे, हे विशेषच आहे. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून आपण कोरोना संकटाचा सामना करत असताना, रंगभूमीवरचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कलाकारांसह पडद्यामागील मोठी यंत्रणा हतबल असताना नाटकाला मानाचा पुरस्कार औचित्याचे आहे. त्यामुळे आता कथा, कादंबरीकडे जसे बघतात, पुस्तके जशी विकत घेतात तशी कदाचित नाटकाच्या संहितेचीही पुस्तकं रसिक विकत घेतील.

‘देवबाभळी’तून तू हुंकार मांडलास, नाटकाच्या संहितेला पुरस्कार हा देखील एक हुंकार आहे...
नक्कीच. मागे एका साहित्य संमेलनाध्यक्षांना मी विचारलं हाेतं की, संमेलनांमध्ये नाटकाच्या संहितांचा विचार का केला जात नाही.
तर ते म्हणाले की, नाटकवाल्यांसाठी नाट्य संमेलन असतं ना? मला काही हे उत्तर पटलं नाही. देवबाभळीत मी जाे हुंकार मांडला आणि साहित्य अकादमीला याच हंुकाराची दखल घ्यावी लागली म्हणजे त्याला साहित्य मूल्य आल्याचे शिक्कामाेर्तब झालेच की. देवबाभळीतून मी सतराव्या शतकातील तुकोबांच्या काळात ‘स्त्री’च्या वाट्याला येणारा भोगवटा आणि तिचं वैयक्तिक पातळी ओलांडून वैश्विक पातळीवरचं सोसणं ठरतं, एकविसाव्या शतकातील स्त्रीदेखील हे सोसणं ‘रिलेट’ करते, असा माझा अनुभव असून ताे मांडला. घराघरातील स्त्रीचं हे सोसणं, संगीत देवबाभळीतील दोन स्त्रिया आपसात वाटून घेतात, शेअर करतात. त्या सोसण्याचा उच्चार मी नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी तर तो स्वीकारलाच, पण आज साहित्य अकादमीसारख्या राष्ट्रीयपातळीवरील मान्यवर संस्थेने या नाटकाची पुरस्कारासाठी दखल घ्यावी, हा संबंध लक्षात घ्यायला हवा.

माेठमाेठ्या मान्यवरांनी आपल्या शब्दांतून देवबाभळीला गाैरवलं आहे, ती एक वारी आहे असं तू म्हणताेस...
- देवबाभळीत दोन बायकांची ही गोष्ट प्रत्येकजण आपापल्या परीने जगण्याशी, सोसण्याशी जोडतो. बाह्य जगात वावरताना आपल्या आत, अंतरंगात काय चाललंय, काय घडतंय बिघडतंय, खुपतंय, दुखतंय...हे दोघी बोलतात. वाद घालतात. एका प्रयोगाला भालचंद्र नेमाडे सर आले होते. नाटक पाहून मला म्हणाले,‘असे मागे जाणे, हेही पुढे जाणेच असते, हे तू दाखवून दिले आहेस,’. मला त्यांची ही दाद महत्त्वाची वाटते. अशा खूप चांगल्या शब्दांतील प्रतिक्रिया माझ्याकडे आहेत. आपण आपल्या मातीतले, अस्सल गाभ्याचे मांडावे, ते वैश्विक होत जाते हा वारकऱ्याचा स्वभाव आहे. कुटुंबाला तीच पार्श्वभूमी असल्याने आपली चांगली भावना, भक्तिभाव ठेवून, चांगल्याला चांगलं मिळतंच ही वारकरी संप्रदायाची शिकवण लक्षात ठेवून परंपरेचा हा झेंडा पुढे न्यायचा हेच माझ्यासारख्या छाेट्या वारकऱ्याचं काम.

बातम्या आणखी आहेत...