आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक स्वराज्य संस्था तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे ओबीसींना ५० टक्के आरक्षण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केल्या नुसार दिले जाईल,अशी माहिती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीतर्फे ओबीसी समाज बांधवांची जिल्हानिहाय संघटना बांधणी करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून सुरू झालेली संवाद यात्रा रविवारी नाशकात आली. त्यावेळी सिडकोत त्रिमूर्ती चौकातील हॉटेल सुरेश प्लाझा येथे आयोजित जिल्हा व महानगर कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यानंतर पांचाळ पत्रकार परिषदेत बोलत होते.
ओबीसी बांधवांना शैक्षणिक व राजकीय आरक्षण उपलब्ध व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे लढा उभारला जाईल, अशी घोषणाही राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी केली. कर्नाटकात जनतेने भाजपाची सत्ता उलथवून टाकली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप प्रणित सरकार पायउतार व्हावे आणि वंचित बहुजन आघाडी तसेच मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर यावे आणि मुख्यमंत्रीपदी ओबीसी व्यक्ती विराजमान व्हावी हे आमचे स्वप्न असून ते निश्चितच साकार होईल, असा विश्वासही प्रा. साळुंखे यांनी व्यक्त केला.
शिवसेना ठाकरे गटाशी आमची युती कायम असल्याचेही त्यांनी नमूद केले. ओबीसींची जनगणना व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरत आहे. मात्र देशातील अनेक सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर आल्यास आम्ही ओबीसींची जनगणना करू,असे पांचाळ यांनी सांगितले.
कोल्हापूर ते नंदुरबार अशा पाच दिवसांच्या संवाद दौऱ्याच्या निमित्ताने ओबीसी तसेच मायक्रो ओबीसी बांधवांशी संवाद साधून आम्ही त्यांची मते जाणून घेतली आहेत. लवकरच त्यांच्या प्रश्नांसाठी कृती कार्यक्रम निश्चित करून ओबीसींना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्याचा आढावा सादर - संवाद बैठकीच्या निमित्ताने त्यांनी जिल्हा व महानगरातील संघटनाबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी सादर केला. महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर झाल्यास त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे शिंदे यांनी सांगितले पत्रकार परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, डॉ. नितीन सोनवणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, संजय साबळे, उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे, सातपूर विभाग अध्यक्ष बजरंग शिंदे, संदीप काकळीज, बाळासाहेब शिंदे, विलास गुंजाळ, दिलीप लिंगायत, प्रतिभा पणपतील, रेखा देवरे, अनिल आठवले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.