आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:‘प्राणदूता’ने आणला 108 मे. टन प्राणवायू; पण राज्याला जेमतेम अर्धाच दिवस पुरणार

नाशिक रोड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपूर 46.5, नाशिक 31, तर अहमदनगरला 31 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन

राज्यात सध्या कोरोना रुग्णांना जाणवत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्याच्या कामाला आता वेग आला असून शनिवारी तब्बल १८०० किलोमीटरवरील विशाखापट्टणम येथून महाराष्ट्राला १०८.५ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला, तर जामनगर येथून ऑक्सिजन आणण्यासाठी हवाई दलाच्या पुणे तळावरून रिकाम्या टँकर्सचे ‘एअर लिफ्टिंग’ही शनिवारी सकाळी झाले.

दरम्यान, विशाखापट्टणम येथून उपलब्ध झालेल्या ऑक्सिजनपैकी नागपूरला ४६.५ मेट्रिक टन, तर नाशिक व अहमदनगरला प्रत्येकी ३१ मेट्रिक टन ऑक्सिजनचे वितरण करण्यात आले. मात्र, मागणी-पुरवठ्याचे गणित लक्षात घेता हा एवढा आटापिटा करून आणलेला हा ऑक्सिजनचा साठा केवळ अर्धा ते पाऊण दिवस पुरेल एवढाच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. राज्यात सध्या दररोज १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते, त्यातील औद्योगिक कारणासाठी वापरला जाणारा ऑक्सिजन पूर्णपणे रुग्णालयांसाठी देण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ३०० ते ४०० मेट्रिक टन आॅक्सिजनची कमतरता जाणवत आहे. ती भरून काढण्यासाठी राज्य शासनाने विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन मागविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या सोमवारी ही ऑक्सिजन एक्स्प्रेस मुंबईच्या कळंबोली येथून रिकामे टँकर्स घेऊन निघाली होती.

गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ती विशाखापट्टणमला पोहाेचली व तेथून आॅक्सिजनचा साठा घेऊन गुरुवारी रात्री ९ वाजता परतीला निघाली. विशाखापट्टणमहून रायपूर, नागपुर, भुसावळमार्गे ती नाशिकला आली. तत्पूर्वी नागपूर येथे ऑक्सिजनचे तीन टँकर (४६.५ मेट्रिक टन) उतरविण्यात आले. त्यातील एक टँकर अमरावती तर दोन टँकर नागपूरसाठी देण्यात आले. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता उर्वरित चार टँकर्समधून ६२ मेट्रिक टन आॅक्सिजन घेऊन ही मालगाडी नाशिकरोड येथील मालधक्क्याला पोहाेचली.

तुटपंुजा पुरवठा
राज्यात सध्या रुग्णांसाठी प्रतिदिन १५०० ते १६०० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. त्यामुळे उत्पादनापेक्षाही ३०० ते ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, एवढा खटाटोप करून प्राप्त केला गेलेला हा १०८.५ मेट्रिक टन लिक्वीड आॅक्सिजन जेथे जेथे पाठविला गेला त्या त्या ठिकाणी जेमतेम पाऊण दिवस पुरणार आहे.

‌‌वायुदलाच्या विमानाद्वारे रिकामे टँकर जामनगरकडे
राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी पुणे येथून ऑक्सिजनचे दोन रिकामे टँकर घेऊन वायुदलाचे विमान शनिवारी दुपारी जामनगरकडे रवाना झालेे. प्रत्येकी १५ टनाचे हे टँकर रस्तामार्गाने किंवा रेल्वेद्वारे लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत.

..तर टळली असती ही आणीबाणी
नाशिक - ऑक्सिजनची आणीबाणी येेऊ शकते, त्यासाठी राज्याने किमान १५ ऑक्सिजन निर्मिती प्लँट्स सुरू करावेत अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधिमंडळाच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या अधिवेशनात केली होती. सध्या ऑक्सिजन प्लँटच्या निर्मितीच्या खर्चापेक्षा राज्य सरकार ऑक्सिजन खरेदी व वाहतूक यासाठी अधिक खर्च करीत असल्याकडे त्यांनी आता लक्ष वेधले आहे. एक डॉक्टर म्हणून माझ्या अनुभवावर मी तो धोका मांडला होता, सरकारने वेळीच पावले उचलली असती तर राज्यात ऑक्सिजनची आणीबाणी उद्भवली नसती’, असे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

सध्या राज्य सरकार ऑक्सिजनची खरेदी व वाहतूक यावर जेवढा खर्च करीत आहे, त्यापेक्षा खूप कमी निधीत ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट उभे राहिले असते. ३० ते ४० लाखांत असा एक ऑक्सिजन प्लँट उभारणे शक्य आहे. हे केले असते तर आज किमान दोन जिल्हे मिळून सरकारचा स्वत:चा एक ऑक्सिजन निर्मिती प्लँट असता आणि या गोल्डन कालावधीत रुग्णांचे प्राण वाचवता आले असते, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

मोठ्या खासगी रुग्णालयांना सक्ती करा
शंभर-दीडशे बेड्सची रुग्णालये मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री व पायाभूत सुविधांवर खर्च करीत असतात. ऑक्सिजनची ही आणीबाणी लक्षात घेता, भविष्यात मोठ्या रुग्णालयांनी त्यांचे स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभे करावेत असा नियम सरकारने करावा. आपल्या स्वत:च्या रुग्णालयात हा प्लँट उभा केल्याने सध्याच्या आपत्तीत तो मोठा दिलासा ठरत आहे. - डाॅ. रणजित पाटील, माजी गृहराज्यमंत्री

बातम्या आणखी आहेत...