आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:कृती आराखडा तयार; उद्योजक, वाहतूकदारांच्या समस्या सोडविणार

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील उद्योजक व वाहतूकदारांच्या वाहतूकविषयक समस्या सोडविल्या जातील आणि त्याबाबतचा कृती आराखडा तयार करून ताे येत्या ४ ते ५ महिन्यांत केंद्र सरकारला सादर करण्यात येईल, असे आश्वासन वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे प्रतिनिधी अभिजित मिश्रा यांनी दिले. केंद्र सरकारच्या धोरणानुसार देशतील उद्योजक आणि वाहतूकदारांच्या वाहतूक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी केंद्राच्या वाणिज्य आणि वाहतूक मंत्रालयातर्फे सर्वेक्षण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अंबड इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे आयोजित चर्चासत्रात मिश्रा बोलत होते. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, बीओटी चेअरमन धनंजय बेळे, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सचिव गोविंद झा,योगिता आहेर, जिल्हा मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड आदी होते.

लॉजिस्टिक सेक्टर, वाहतूकदार, वाहतूक सेवा पुरवठादार, टर्मिनल चालक, आयात आणि निर्यातदार यांच्यासाठी केंद्रसरकार काय उपाययोजना करणार आहे याची माहिती देऊन उपस्थित उद्योजक आणि मालवाहतूकदार यांनी विचारलेल्या प्रश्नांची मिश्रा यांनी समर्पक उत्तरे दिली. आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आयमातर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.बीओटी समितीचे चेअरमन धनंजय बेळे यांनीही लॉजिस्टिक पार्क व ट्रक टर्मिनल उभारण्याची गरज व्यक्त केली. वाहतूक व्यावसायिकांच्या समस्या मात्र कोणतीही यंत्रणा जाणून घेत नाही आणि त्यामुळे चालकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, अशी खंत वाहतूकदार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फड यांनी व्यक्त केली.

आयमा सदस्य हर्षद बेळे यांनी या व्यवसायातील एक खिडकी योजना व टेंडर कालावधीच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज प्रतिपादन केली. यावेळी आयमाचे सदस्य राहुल गांगुर्डे,अभिषेक व्यास,रवींद्र झोपे, देवेंद्र राणे, जगदीश पाटील, हेमंत खोंड, एनडीटीएचे पी.एम.सैनी, सुभाष जांगरा, संजय राठी, बालाजी ट्रान्स्पोर्ट जयपाल शर्मा, यशपाल पवार, सुनील भुरे, सूरज शहा आदी उपस्थित होते.