आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​कोरोना उपचारात खासगी रुग्णालयांनी केली सरासरी 1 लाख 55 हजारांची अधिक आकारणी; जनआरोग्य अभियान अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

नाशिक4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • उपचाराचा खर्च 25 लाखांपेक्षा जास्त

खासगी रुग्णालयांमधील कोविड उपचारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकाच्या तुलनेत प्रत्यक्षात प्रत्येक रुग्णाकडून सरासरी १ लाख ५५ हजार ९३४ रुपयांची अतिरिक्त आकारणी झाल्याचे धक्कादायक निष्कर्ष जन आरोग्य अभियान आणि कोविड विधवा पुनर्वसन समितीतर्फे करण्यात आलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून समोर आले आहेत. त्यामुळे शासनाने एक आयोग नेमून या खर्चाचे ऑडिट करावे व कर्जबाजारी कोविड विधवांना त्यांच्याकडून झालेली अतिरिक्त बिलांची आकारणी परत मिळवून द्यावी, अशी मागणी नाशिकमध्ये झालेल्या संताप सभेत करण्यात आली. कोविडच्या उपचारांसाठी खासगी रुग्णांसाठी आरोग्य खात्याने दर पत्रक जाहीर केले होते. एका बेडसाठी प्रति दिन ४ हजार रुपये, आयसीयूसाठी ७ हजार रुपये आणि व्हेंटिलेटर बेडसाठी ९ हजार रुपये असा दर आखून देण्यात आला होता.

प्रत्यक्षात किती खर्च आला यासाठी जन आरोग्य अभियान आणि कोविड विधवा पुनर्वसन समिती यांच्या संयुक्त विद्यामाने राज्यातील २० जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या परिवारांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात रुग्णांवर किती दिवस उपचार करण्यात आले, त्यासाठी रुग्णालयाचे किती बिल आकारण्यात आले, औषधांचा खर्च किती आला याची माहिती घेण्यात आली. यावेळी पतीच्या उपचारांसाठी झालेली परफट आणि उपचारांच्या खर्चासाठी डोक्यावर चढलेला कर्जाचा बोजा याबाबत कोविड विधवांनी यावेळी त्यांच्या व्यथा मांडल्या. जन आरोग्य अभ्यासक डॉ. अभय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नाशिकमधील संताप सभेत मांडण्यात आले. सभेची प्रस्तावना हेरंब कुलकर्णी यांनी केली तर स्वागत लोकनिर्णय संस्थेचे संतोष जाधव यांनी केले.

१८ लाखांचे बिल झाले
माझ्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मलाही लागण झाली होती. क्वाॅरंटाईन असून इंजेक्शनसाठी तीन तास रांगेत उभे राहिले. चेहरे आणि गाड्या बघून ओळखी लोकांनाच इंजेक्शन दिली जात होती. पतीची तब्येत खालावली पण कुणीच त्यांच्या जवळ फिरकले नाही. डिस्चार्ज मागितला तर १८ लाख बिलाची मागणी झाली. अखेरीस ते गेलेच. - रिद्धी क्षीरसागर, पीडित

सर्वेक्षणाचे निष्कर्ष

 • ७५% रुग्णांकडून शासनाच्या दरपत्रकापेक्षा अतिरिक्त बिलाची वसुली
 • काही कुटुंबांच्या बिलांच्या रकमा १५ ते ३८ लाखांच्या घरात
 • सरासरी दररोजचा खर्च २१ हजार २१५ रुपये आला
 • प्रत्येक रुग्णाकडून सरासरी १ लाख ५५ हजार ९३४ रुपये आकारणी
 • औषधांसाठी सरासरी ९० हजार रुपयांचा खर्च
 • बरे झालेले रुग्ण ४९ %, मृत झालेले रुग्ण ५१ %
 • २,५८० परिवारांची पाहणी, यात १०५९ कोरोना विधवांचा समावेश
 • त्यापैकी ५६ % कुटुंबांनी घेतली वैयक्तिक कर्जे
 • ७३ % कोविड विधवा कर्जबाजारी

उपचाराचा खर्च २५ लाखांपेक्षा जास्त
कुटुंबातील दहा वर्षांच्या मुलासह घरातील सर्वांनाच संसर्ग झाला होता. पतीला तीन रुग्णालयात नेले, मात्र इंजेक्शन मिळाले नाही. आमच्या कुटुंबातील सर्वांच्या रुग्णालयाचा खर्च २५ लाखांच्या वर गेला. - अस्मा राजे, पीडित

मदत नाही तर परतफेड तरी करा
पतीचे अकस्मात निधन, रोजगाराचा प्रश्न आणि अवाजवी खर्चामुळे झालेला कर्जाचा डोंगर या पार्श्वभूमीवर कोविड विधवांना थेट मदत मिळावी त्यावर सरकार बोलत नाही. किमान बिलापोटी खर्च झालेली अतिरिक्त रक्कम तरी त्यांना परत करावी अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली आहे. - हेरंब कुलकर्णी, निमंत्रक, कोविड विधवा पुनर्वसन समिती

बातम्या आणखी आहेत...