आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपोत्सव:कोरोनाकाळात उत्पादन घटले; प्रदूषण मंडळाकडून जुन्याच फटाक्यांची चाचणी

नाशिक / मनोहर घोणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या प्रदूषणामुळे सरकारपासून सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांबाबत गंभीर विचार केला आहे. राज्यात फटाकाबंदी झाली नसल्याने उत्पादकांवर फटाक्यांची तीव्रता कमी करण्याबाबत अटी व नियम लावण्यात आले आहेत. मात्र, फटाक्यांबाबत ठाेस धाेरण नसल्याने बाजारपेठेत जुनेच फटाके उपलब्ध आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही जुन्याच फटाक्यांची चाचणी घेऊन आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले नसल्याचा अहवाल सादर केला आहे, तर फटाक्यांच्या सुरक्षिततेबाबतची जबाबदारी असलेल्या एक्स्प्लाेझिव्ह विभागाने ‘नराे वा कुंजराेवा’ची भूमिका घेतली आहे. दरम्यान, १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणारे फटाके प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने नागरिकांनी ६० ते १२० डेसिबलच्या मर्यादेपर्यंतचे फटाके फाेडावेत, असे आवाहन आैद्याेगिक सुरक्षा व आराेग्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर फटाका विक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षीच आराेग्यमंत्र्यांनी ठेवला हाेता. मात्र, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या समितीने तो फेटाळून लावला हाेता. त्यामुळे राज्यात फटाकाबंदी झालीच नाही. सर्वोच्च न्यायालयानेही केवळ उत्सवाच्या दिवशी रात्री आठ ते दहा या वेळेत फक्त दोन तास फटाके वाजवण्यास परवानगी दिलेली आहे. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी मागील दाेन वर्षांपूर्वीचेच फटाके उपलब्ध आहेत.

एक्स्प्लाेझिव्ह विभागाची टाेलवाटाेलवी
फटाक्यांच्या सुरक्षिततेबाबत एक्स्प्लाेझिव्ह विभागाच्या नागपूर येथील मुख्यालयातील विविध अधिकाऱ्यांशी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने संपर्क साधला. मात्र, काही अधिकाऱ्यांनी फटाक्यांविषयी बाेलण्यास नकार दिला. काही अधिकाऱ्यांनी गाेंडखेरी, मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगून टाेलवाटाेलवी केली.

प्रदूषण मंडळाने अशी केली चाचणी : प्रदूषण नियंत्रण मंडळाने बाजारपेठेतील वेगवेगळ्या कंपन्यांच्या फटाक्यांचे नमुने घेऊन नाशिकमधील सपकाळ नाॅलेज हबच्या माेकळ्या जागेवर फटाक्यांची चाचणी घेतली. फटाका पेटवण्यात येणाऱ्या जागेपासून चार मीटरवर वेगवेगळ्या ठिकाणी आवाज माेजण्याचे यंत्र ठेवण्यात आले हाेते. मात्र, चाचणीसाठी जुन्याच फटाक्यांचा वापर करण्यात आल्याने आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले नाही. त्याबाबतचा अहवाल तयार झाला आहे.

‘नीरी’कडून चार प्रकारच्या ग्रीन फटाक्यांचा शाेध
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने चार प्रकारच्या ग्रीन फटाक्यांचा शोध लावला आहे. ते दिसायला पारंपरिक फटाक्यांसारखे असून त्या फटाक्यांमुळे ५० टक्क्यांहून कमी प्रदूषण हाेणार असल्याचे नीरीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

बहुसंख्य फटाके असुरक्षितच
मुळात अनेक प्रकारचे फटाके घातक आहेत. फटाक्यांमुळे हाेणारी मनुष्यहानी लक्षात घेता नागरिकांनी कमी आवाज करणारे फटाके काळजीपूर्वक फाेडावेत. - एम. आर. पाटील, सहसंचालक, आैद्याेगिक सुरक्षा व आराेग्य संचालनालय

कमी आवाजाच्या फटाक्यांना प्राधान्य द्यावे
- कमी तीव्रतेच्या फटाक्यांना प्राधान्य द्यावे. त्यात ६०, ७०, ८०, ९०, ११४ अशी कमी डेसिबलचे फटाके खरेदी करावेत.
- शक्यताे शाेभेचे फटाके फाेडावेत.
- फटाके फाेडताना डाेळ्यांना इजा पाेहाेचू नये यासाठी केमिकल्ससाठी वापरण्यात येणारा चष्मा वापरावा.
- वसाहतीपासून दूर माेकळ्या जागेवर फटाके फाेडावेत.
- फटाक्यातील तांबे व कॅडमियमसारखी विषारी रसायने हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात.
- माेठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे कानांच्या पडद्यांवर ताण पडून कायमचा बहिरेपणा येऊ शकताे.
- फटाक्यांमधील रसायनांमुळे डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे आदी समस्या निर्माण होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...