आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा कांदा, द्राक्ष व इतर भाजीपाला शेतीमालास योग्य बाजारभाव मिळण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येथील बाजार समितीत सुरू केलेले उपोषण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. ४) सायंकाळी तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित केले. केंद्र व राज्य सरकारने कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव द्यावा, आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला प्रतीक्विंटल १५०० रुपयेप्रमाणे अनुदान द्यावे, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली येथील बाजार समितीत शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. ३) उपोषण सुरू केले होते. शनिवारी शासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.
मात्र मागण्यांबाबत ठाम रहात उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरू ठेवले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सांयकाळी ४ वाजता केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार, पुणे येथील राज्याचे पणन संचालक विनायक कोकरे, माजी पणन संचालक सुनिल पवार, जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांनी फोनद्वारे उपोषणकर्त्यांशी चर्चा करुन व उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक समीर बारवकर, सहायक निबंधक सविता शेळके, चांदवड बाजार समितीचे प्रशासक अनिल पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सरकार तुमच्या मागण्यांसंदर्भात योग्य तो विचार करत असून तुम्हाला योग्य न्याय मिळवून देण्याची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले.
रविवार ते मंगळवार या तिनही दिवशी सरकारी कामकाजाला सुट्टी आली असता सरकारला आमच्या मागण्यांसंदर्भात विचार करायला वेळ मिळावा म्हणून उपोषण स्थगित करत असल्याचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी मागण्यांबाबत विचार न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, भीमराव जेजुरे, शिवाजी कासव, विजय जाधव, संपतराव वक्ते, समाधान जामदार, अॅड. अन्वर पठाण, दत्तू ठाकरे, विजय कुंभार्डे, भीमराव निरभवणे, दीपांशू जाधव, बापू शिंदे, किसनराव जाधव, पप्पू कोतवाल, पंकज दखने, बाळासाहेब शिंदे, कैलास कोतवाल, नंदू कोतवाल आदींसह शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.