आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांपासून बंद:गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रस्ताव, आमदार कांदेंच्या मागणीची रेल्वे प्रशासनाकडून दखल

प्रतिनिधी | मनमाड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील चाकरमाने आणि प्रवाशांसाठी जीवनवाहिनी असलेली मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करावी आणि मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे ओवरब्रीज नव्याने उभारावा, अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी भुसावळ विभागाचे रेल प्रबंधकाकंडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, कांदे यांच्या या दोन्ही मागण्यांची प्रशासनाने दखल घेतली असून गोदावरीबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.

रेल्वे ओवरब्रीजचे पुनर्निर्माण करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला असून याबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती अप्पर मंडल रेल प्रबंधक सुनिलकुमार सुमंत यांनी पत्राद्वारे आमदार कांदे यांना दिली. मनमाड रेल्वे स्थानकाजवळ शिर्डी-इंदूर राष्ट्रीय महामार्गावर रेल्वेचा ओवरब्रीज असून तो आता जीर्ण झाला आहे. यासंबंधी बांधकाम विभागाची बैठक घेऊन या ओवरब्रीजचे स्ट्रक्चरल ऑडिट बांधकाम विभागातर्फे करणे सुनिश्चित केले आहे. मनमाड कुर्ला-गोदावरी एक्स्प्रेस ही गाडी दोन वर्षांपासून कोविडचे कारण देत बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी मनमाड मुंबई समर स्पेशल ही पर्यायी गाडी सुरू करण्यात आली आहे. मात्र तीही सध्या आठवड्यातून तीन दिवस धुळ्याहून सोडण्यात येते. कोणतीही गाडी सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय हा रेल्वे मंत्रालयातर्फे घेतला जातो. आमदार कांदे यांची ही गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत मनमाडमधूनच सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयास कळवण्यात आल्याचे सुमन यांनी पत्रात नमूद केले आहे. मनमाड कुर्ला-गोदावरी एक्स्प्रेसने श्रमिक कामगार, चाकरमाने, मनमाड, नांदगाव येथून, नाशिक, मुंबईसाठी प्रवास करतात म्हणून गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी, ओवरब्रीजचा कालावधी संपुष्टात आला असूनही वापर सुरू आहे. अवजड वाहने या पुलावरून धावल्याने मोठी जोखीम आहे. पुलाची उपयोगिता संपल्याने ताे नव्याने उभारावा, याकडे आ. कांदे यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या दोन्ही मागण्यांना रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.