आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्त पुरवणे आवश्यक असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा एकदा पोलिस प्रशासनाला पालिकेने पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी गोदावरी प्रदूषणमुक्ती व सौंदर्यीकरणाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आठवड्यातून किमान दोन वेळा गोदावरीची पाहणी करून प्रदूषण थांबवण्यापासून तर अन्य आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना ते देत आहेत. दुसरीकडे, गोदावरी गटारीकरण विरोधी मंचने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने नदीपात्रात वाहने धुणे, कपडे धुणे तसेच अन्य निर्माल्य टाकणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना आहेत. त्यासाठी नदी किनाऱ्यावर पोलिस बंदोबस्त देण्याच्याही सूचना आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मध्यंतरी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एक निरीक्षक आणि ४० पोलिस कर्मचाऱ्यांचे एक पथक कायमस्वरूपी नेमण्याबाबत सूचना केली होती. मात्र त्यानुसार कारवाई होत नसल्याचे बघून आयुक्त पवार यांनी यासंदर्भात पोलीस प्रशासनालाच पत्र पाठवून उच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे पोलिस पथक स्थापन करण्याची आठवण करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
गाेदाकाठावरील अनधिकृत धोबीघाट जमीनदोस्त गोदावरी नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर कारवाई करण्यासाठी पालिका आयुक्त रमेश पवार यांनी केलेल्या दौऱ्यात आढळलेला अनधिकृत धोबीघाट महापालिकेने गुरुवारी जमीनदोस्त केला. चोपडा लॉन्स परिसरात गोदापात्रालगत असलेला खासगी व्यावसायिकांच्या अनधिकृत धोबीघाटावर हातोडा फिरवला गेला. उच्च न्यायालयाने गोदावरी पात्रामध्ये धुणे धुण्यासाठी बंदी घातली असताना दगडी पक्क्या स्वरूपात असलेला धोबीघाट कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, हा धोबीघाट चालवणाऱ्यास १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाईदेखील केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.