आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील वडाळागावासह जुन्या नाशकातील कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी जागाच उपलब्ध नाही. तसेच, कोरोना रुग्णाचे मृतदेह पीपीई किटमध्ये दफन करण्यात आल्याने त्याचे विघटन होत नसल्याने अडचण निर्माण झालेली आहे. या सगळ्याचा विचार करून महापालिकेने कब्रस्तानसाठीची राखीव जागा लवकरात लवकर मुस्लिम समाजाला द्यावी अन्यथा महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टी कर देणारच नसल्याच्या ८ हजार सह्यांचे निवेदन मुस्लिम समाजाने शुक्रवारी (दि. २) महापालिका आयुक्तांना दिले.
खतिब ए शहर हाफिज हिसामोद्दीन साहब खतिब यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजिज पठाण, युसुफिया फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी मुजाहीद शेख, खलील देशमुख, फिरोज मन्सूरी, इब्राहिम अत्तार, अकील खान उपस्थित होते. शहरातील जे जूने कब्रस्तान आहेत तेथे दफनविधी करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे शासनाने आरक्षित केलेल्या कब्रस्तानच्या जागा मुस्लिम समाजाला बहाल करण्यात येऊन त्या ठिकाणी दफनविधी करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटलेे आहे की, एखाद्या मयतासाठी सद्याच्या कब्रस्थानामध्ये कबरी खोदल्यानंतर विघटन न झालेले मृतदेह दिसतात.
शहरात नानावली भाग, कन्नमवार पुलाजवळ गट क्रमांक ४०६ व ४०७ ही जागा महापालिकेची असून दफनभूमीसाठी राखीव आहे. तसेच वडाळा शिवारातील गट क्रमांक ६३,६४, ६५ या जागेवरही दफनभूमीसाठी आरक्षण टाकलेले आहे. परंतु मागील ३ ते ४ वर्षांपासून जमीन मालकांना पैसे अदा न केल्याने आज पावेतो सदरची जमिनही महानगर पालिका ताब्यात घेऊ शकलेली नाही. आता जो पर्यंत मुस्लिम दफनभूमीसाठी जागा मिळत नाही तोपर्यंत पालिकेस कोणताही कर अदा करणार नसल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.
अन्यथा करच भरणार नाही पहिल्यांदाच नानावली भागात कब्रस्तानासाठी जागा देण्यात आली. मात्र तो ही ठराव पुन्हा रद्द करण्यात आल्याने समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. मुस्लिम समाजाला न्याय मिळावा म्हणून याचिका दाखल केली. त्यात ही न्यायालयाची दिशाभूल करुन वडाळागावाच्या जागेचा भूसंपादन न करता कब्रस्तानला जागा दिल्याचे सागण्यात आले. आता महापालिकेने कब्रस्तानसाठी जागा नाही दिली तर मुस्लिम समाज महापालिकेला करच भरणार नाही. - अजिज पठाण, जिल्हाध्यक्ष, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड
दफनविधीला जागा नाही नाशकातील कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी जागाच उपलब्ध नाही. कोरोना रुग्णाचे मृतदेह पीपीई किटमध्ये दफन करण्यात आल्याने त्याचे विघटन होत नाही. यामुळे पालिकेकडून लवकरात लवकर कब्रस्तानसाठी जागा द्यावी. - हाफिज हिसामोद्दीन साहब खतिब, खतिब ए शहर
तत्काळ भूसंपादन करा वडाळागाव शिवारात असलेली स.नं. ६३, ६४, ६५ ही जागा दफनभूमीसाठी महापालिकेने आरक्षित केलेली असून ही जागा महापालिकेने त्वरित भूसंपादित करून मुस्लिम समाजासाठी उपलब्ध करून द्यावी. दफनविधीसाठी खूप अडचणी येत आहेत. - हाजी मुजाहीद शेख, अध्यक्ष युसुफिया फाउंडेशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.