आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे 2021-22 हे जन्मशताब्दी वर्ष होते. याचेच औचित्य साधत संस्कृती वैभवतर्फे स्वरभास्कर महोत्सव नाशिकमध्ये होत आहे. शनिवारी (ता. 18) सायंकाळी साडेचार ते रात्री साडेबारा या वेळेत नाशिकच्या कालिदास कला मंदिरात हा महोत्सव होत असून यावेळी पंडितजींचे कुटुंबियही उपस्थित राहणार आहे.
यांची असेल उपस्थिती
महोत्सवाला पं. भीमसेन जोशी यांचे चिरंजीव जयंत जोशी, शुभदा जोशी मुळगुंद, पंडित श्रीनिवास जोशी आणि पंडितजींचा नातू चिरंजीव विराज जोशी यांच्यासह परिवारातील अनेक जण उपस्थित राहणार असल्याचे माहिती नंदन दीक्षित यांनी दिली.
ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान
यावर्षीचे संस्कृती वैभव स्वरभास्कर महोत्सवाचे पुरस्कार पंडितजींना 40 वर्ष अखंडपणे साथ करणारे ज्येष्ठ टाळ वादक आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर पुणे, ज्येष्ठ तबलावादक आदरणीय पंडित शशिकांत उर्फ नाना मुळे मुंबई, तसेच नाशिक मधील पंडितजींचे शिष्य डॉ. पंडित अविराज तायडे यांना घोषित करण्यात आले आहेत.
असे आहे पुरस्काराचे स्वरूप
संस्कृती आणि वैभव यांचा प्रतीक असलेली सुबक मूर्ती, सन्मान पत्र आणि सन्मानचिन्ह, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार जयंत जोशी शुभदा मुळगुंद आणि पंडित श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
पंडित उपेंद्र भट, पंडित हरीश तिवारी, पंडित आनंद भाटे या दिग्गज मंडळींसह पंडितजींच्या सहवासातील मुकुंद संगोराम, सतीश पाकणीकर, सुधीर गाडगीळ वादक सहकारी पंडित नाना मुळे, माऊली टाकळकर, भरत कामत, सुधिर नायक, मुकुंदराज देव, नितीन वारे, सुभाष दसककर आणि डॉक्टर पंडित अविराज तायडे उपस्थिती लावणार आहेत. असे संस्थेचे उपाध्यक्ष पी एस कुलकर्णी यांनी सांगितले. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत रसिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पंडितजींच्या आठवणींना उजाळा
याशिवाय त्या जीवनावर आधारित अनेक मान्यवरांचे लेख असलेली संग्राह्य स्मरणिका देखील नाशिककरांना दिली जाणार आहे.पंडितजींच्या छायाचित्रांवर आधारित त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम जोशी परिवारातील जवळचे सदस्य आणि प्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणीकर करणार आहेत. पंडितजींच्या परिवारातील सदस्य आणि सहकारी यांच्याशी मनमुक्त गप्पा आणि सांगीतिक परिसंवाद यावेळी होणार आहे.
शास्त्रीय संगीताची मेजवानी
शिवाय पंडित आनंद भाटे, पंडित उपेंद्र भट, पंडित हरीश तिवारी, पंडित श्रीनिवास जोशी, डॉक्टर पंडित अविराज तायडे, आणि कुमार विराज जोशी यांच्या शास्त्रीय गायन, बंदिश, ठुमरी, संतवाणी अशा मराठी-हिंदी आणि विशेष करून कानडी भाषेतल्या मैफिली या महोत्सवात रंगणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.