आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाच्या योजनांची अंमलबजावणी भाजप पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने करा. भाजप आमदारांच्या मतदारसंघात ते या योजना राबवतीलच, पण विरोधी आमदारांच्या मतदारसंघातही त्या राबविताना भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या.अशी तंबी राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिली.
कुठल्या आमदाराने यात जर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर माझा आदेश असल्याचा निरोप द्या. म्हणजे अडचण होणार नाही. असेही ते म्हणाले.
अधिकाऱ्यांना भरला दम
मला अडचणीत आणू नका, अन्यथा तुमच्या अडचणीत मी वाढ करेल, असा इशारावजा दमच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसुली अधिकाऱ्यांना दिला. तसेच पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींवरून अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणीही यावेळी त्यांनी केली.
अधिकारी पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये शासकीय अधिकारी अाणि भाजप पदाधिकारी यांची संयुक्त बैठक विखे पाटील यांनी घेतली. यावेळी ते म्हणाले, महाराजस्व अभियान प्राधान्याने राबवा, गावागावांत शिबिरे घ्या. कार्यकर्त्यांची कामे करा. लोककल्याणाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहाेचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा स्तुत्य उपक्रम अाहे. १५ जूनपर्यंत जिल्ह्यात तो प्रभावीपणे राबवा, अशा सूचना दिल्या.
यावेळी अतिक्रमित इमारती तसेच रस्त्यांवर भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण, जिल्ह्यातील घरकुल जागा हस्तांतरित करणे, विहिरी खोदाईसाठी जागा देणे, रस्ते, पशुसंवर्धन विभागाचा कारभार, गृहनिर्माण संस्थांच्या समस्या व मुद्रांक नोंदणी कार्यालयांमधील असुविधांचा पाढा पदाधिकाऱ्यांनी वाचून दाखविला.
नाशिक शहरातील सिटी सर्व्हेअंतर्गत ५०० हून अधिक केसेस प्रलंबितच हा मुद्दाही बैठकीत चर्चिला गेला. त्यावर सोमवारीच सिटी सर्वेचा प्रश्न सोडवा, प्रसंगी विभागीय अायुक्तांची मदत घ्या, असेही अादेश भूमीअभिलेखच्या अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिले. अामदार अॅड. राहुल ढिकले, डाॅ. राहुल अाहेर, सीमा हिरे, विभागीय अायुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन अादींसह अधिकारी उपस्थित होते.
बैठक आता दरमहा
महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचा नियमित अाढावा अापण घेणार अाहोत. तसेच पदाधिकारी अाणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन शासकीय योजना प्रभावीपणे राबवू. पुढील बैठक १५ जुलैदरम्यान घेण्याचेही यावेळी विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
उंटांच्या मृत्यूबाबत अधिकाऱ्यांना सुनावले
शहरात दाखल उंटांचा मृत्यू होत असल्याची तक्रारी आल्यानंतर लागलीच पशुसंवर्धन विभागालाही त्यांनी यात लक्ष घालण्याचे अादेश दिले. याबाबत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. जिल्ह्यात पोल्ट्री फार्म व गोट फार्म किती, या माध्यमातून किती शेतकरी या व्यवसायात आहेत. त्यांचे प्रश्न काय याबाबत विचारले असता संबधित अधिकारी याबाबत समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने त्यांनी संबधितांना कारभार सुधारा अशी तंबी दिली.
तो अधिकारी कोण?
येवल्याचे प्रभारी गटविकास अधिकारी घरकुलांसाठी चिरीमिरी मागतात. गेल्या ८ वर्षांत चारवेळा सदर अधिकाऱ्यांची प्रभारी पदी नियुक्ती झाल्याची तक्रार आली. उपनिबंधक कार्यालयातही स्टॅम्प वेंडरच एजंटगिरी करतात, अशी तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर प्रभारी अधिकारी बैठकीत आहे का? कोण आहे तो पाहू तरी द्या, असे विखे-पाटील म्हणाले.याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.