आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. १०) वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. स्मार्ट रोडवर सीबीएस परिसरात तळे तयार झाले. यातून मार्ग काढताना वाहनचालकांचा गोंधळ उडत होता. वीजतारांवर वृक्ष कोसळल्याने विविध भागात सुमारे दोन तास वीज खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. गुरुवारी व शुक्रवारी अशा दोन दिवसांच्या पावसामुळे महापालिका व महावितरणने केलेल्या पावसाळापूर्व कामांचे पितळ उघडे पडले असून नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
शुक्रवारी पावसाने वृक्ष कोसळून वीजतारा तुटल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. वडाळानाका परिसरातील वीजतारांवर झाड पडल्याने या परिसरातील वीजपुरवठा दोन तास बंद पडला. नागजी भागातही वीज खंडित झाली हाेती. महावितरणने युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा सुरळीत केला. अनेक ठिकाणच्या वीजतारा जीर्ण झाल्या असून त्याकडे महावितरण व महापालिकेने मान्सूनपूर्व काम करताना दुर्लक्ष केले. जादा जोडणीच्या भाराने वीज खांब झुकले आहेत. तर काही ठिकाणी तारा जमिनीपर्यंत झुकल्या आहेत. तारांमध्ये अडकलेल्या झुडुपांची छाटणी न केल्याने पाऊस व वारा आल्यास तारांमध्ये घर्षण होते व वीज खंडित हाेते. याबाबतच्या तक्रारींकडे महावितरणकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
गुरुवारी झालेल्या पावसामुळे पालिकेच्या भोंगळ कामाचा नागरिकांना अनुभव आला. सातपूरच्या प्रभाग क्र. १२ मधील रस्त्यांवर पाणी साचले तर काही ठिकाणी घरात पाणी शिरले. नाले सफाई न केल्याने ही स्थिती उद्भवली असून पालिकेने आठवडाभरात उपाय न केल्यास आयुक्तांच्या दालनात सांडपाणी टाकून आंदोलन करण्याचा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचा वतीने देण्यात आला.
पावसाळापूर्व कामे, तरीही नागरिक अंधारातच पावसाळ्यात सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने महावितरणतर्फे पावसाळापूर्व कामे करण्यात आली. यात झाडांच्या फांद्या छाटतानाच दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली हाेती. एवढे करूनही पहिल्याच पावसात सातपूर परिसरात वीज गायब झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.