आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस पाणी संकलन:चार गावांत होणार पाऊस पाणी संकलन; पाण्याची शाश्वतता, उपलब्धता वाढविण्यासाठी निर्णय

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत ग्रामपंचायत हद्दीत पाण्याची शाश्वतता व पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय कार्यालये व गावातील घरांवर पाऊस पाणी संकलन करण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी प्रथमदर्शनी नाशिक तालुक्यातील चांदशी, दरी, मातोरी व यशवंतनगर या चार गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली.

राज्य शासनाच्या धोरणानुसार पावसाचे पाणी संकलन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासन लीना बनसरोड यांनी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांना दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या चारही ग्रामपंचायतींअंतर्गत असलेले सर्व शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालयासह गावातील घरांवर पाऊस पाणी संकलनासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाऊस पाणी संकलन करण्याच्या उपाययोजनांची कामे करून या ग्रामपंचायती जिल्ह्यासाठी आदर्श ग्रामपंचायती ठराव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करणे, गृहभेटीचे आयोजन करणे, महिला सभा, ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेण्यात येणार आहेत. यासाठी लागणारा निधीचा स्त्रोत शोधून सदर कामे पावसाळा सुरू होण्याअगाेदर करण्यात येणार आहेत. या कामांसाठी सार्वजनिक स्तरावरील कामांसाठी १५ वा वित्त आयोग व कुटुंबस्तरावरील कामासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना यासह लोकवर्गणी व लोकसहभाग पूर्ण करण्यात येतील.

पाऊस पाणी संकलनासाठीच्या या अभिनव उपक्रमाचे नियोजन व संनियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत कार्यरत कर्मचारी, सल्लागार यांना प्रत्येक गावाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी नियुक्त केलेल्या ग्रामपंचायतीसोबत सतत संपर्क व प्रत्येक आठवड्यातील किमान दाेन दिवस क्षेत्रभेटी देऊन पावसाळा सुरू होण्याअगाेदर कामे पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविली असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...