आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:गिरणा गौरव पुरस्कार सोहळ्यात रामदास फुटाणे यांचा मार्मिक टोला; वारा पाहून उफनावं हे कृत्य ‘राज’कारणी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारा ज्या दिशेने असेल त्या दिशेने उफनावं असं करणं हे राजकारणी कृत्य आहे. असे म्हणत भोंगा कितीही मोठा असला तरी शेवटी राम नाम सत्य आहे... राम नाम सत्य आहे... असा मार्मिक टोला ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी लगावला.

गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी (दि.५) कालिदास कला मंदिरात झालेल्या गिरणा गौरव पुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. फुटाणे यांनी राज ठाकरे यांनी वक्तव्य केलेल्या भोंगे प्रकरणाचा संदर्भ घेत त्यांचे नाव न घेता मार्मिक फटकेबाजी केली. ते म्हणाले की, भोंग्यासारख्या प्रकरणावर चर्चाचर्वण होते मात्र कोट्यवधी लोकांना आपण जेवण, अन्न, पाणी देऊ का? त्यावर एकही राजकीय पक्ष बोलत नाही. प्रदूषण अनेक प्रकारे येथे येत आहे. त्याकडे लक्ष दिले जात नाही. पण भलत्याच मुद्यांना राजकारणी मंडळी महत्त्व देत असल्याची खंतही यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग, पालकमंत्री छगन भुजबळ, प्रमुख पाहुणे सुरेश चव्हाणके, स्मार्ट सिटीचे सुमंत मोरे, आनंद अॅग्रोचे उद्धव आहेर, रुंगटा ग्रुपचे निखिल रुंगटा,अभिषेक बुवा, निर्माणचे नेमचंद पोद्दार, प्रतिष्ठानचे सुरेश पवार, भारत गोसावी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी तर प्रास्ताविक स्वाती पाचपांडे यांनी केले. भावेश बागुल यांच्या पथकाने डोंगरांची स्थिती दर्शविणारे आदिवासी नृत्य सादर केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री भुजबळ यांनीही यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी नदी प्रदूषणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना तीची स्वच्छता करण्याची आपलीच जबाबदारी असल्याची आठवण नाशिककरांना करून दिली.

अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह ३८ जणांचा सन्मान
ग्रामीण भागातील गुन्हेगारी नियंत्रणात आणणारे नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, साहित्यिक वसंत आबाजी डहाके, राजन गवस, डॉ. राजेंद्र भारुड, डॉ. दिलीप स्वामी, शंभू पाटील, भास्कर पेरे-पाटील, संदेश भंडारे, हर्षवर्धन सदगीर, सुमती लांडे, मंगला बनसोडे, प्रशांत मोरे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा, डॉ. निशिगंधा वाड, गुरू ठाकूर, शिल्पा देशमुख, मच्छिंद्र कदम, वैशाली बालाजीवाले, खंडू मोरे, शिवाजी मानकर, डॉ. राजन पाटील, डॉ. अनिल निकम, मिलिंद सजगुरे, अॅड. पंकज चंद्रकोर, रुक्मिणीताई दराडे, विनोद ठाकरे, रेखा महाजन, सुरेखा भालेराव, गंगा पगार, कैलास खैरनार, बंडू बच्छाव, बिंदूशेठ शर्मा, नानाजी जाधव, दीपक देवरे, महेश पवार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सावानाचे दिवंगत अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांना मरणोत्तर गिरणा गौरव पुरस्कार देण्यात आला.

नद्यांचा नैसर्गिक प्रवाह कायम राहणे अत्यावश्यक
नीर, नारी आणि नदीला आई मानणाऱ्या भारतात नद्यांची प्रदूषणाने दुर्दशा झाली आहे. नाशिकच्या गिरणा आणि गोदावरी या प्रमुख नद्यांच्या प्रदूषणाने उच्चतम पातळी गाठली आहे. यास नदीपात्रातील अतिक्रमण आणि घाट बांधणी यासोबतच शहरातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी जबाबदार दिसत असले तरीही खऱ्या अर्थाने नदीचा नैसर्गिक प्रवाह कायम राहाणे अत्यावश्यक आहे. त्यावर काम करणे आवश्यक असताना भलत्याच बाबींवर खर्च करणे म्हणजे आजार हृदयाचा आणि उपचार दंतवैद्याकडून करण्यासारखे असल्याची तीव्र खंत व्यक्त करत आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...