आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळकावण्याचा प्रयत्न:पदपथ, रस्त्यांवरच हॉटेल्सची सर्रास अतिक्रमणे, पालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष

नाशिक / जहीर शेखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हॉटेल व्यावसायिकांकडून होणाऱ्या अतिक्रमणांवरील कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाईबाबत संशय व्यक्त होत आहे. हॉटेलसमोरील जागेसह इतर मोकळ्या जागेत अतिक्रमण करून त्याचा व्यावसायिक वापर केला जात आहे. परिणामी वाहतूक कोंडीचीही समस्या वाढत आहे. यावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत...

शहरातील बाजारपेठेसह रहिवासी भागातही अतिक्रमणे वाढल्याने रस्ते निमुळते होत असल्याने अपघातांची तसेच वाहतूक कोंडीचीही समस्या तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांकडून वारंवार महापालिका प्रशासनाकडे मागणी करूनही केवळ ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे अतिक्रमणांबाबत मनपा उदारमतवादी धोरण स्वीकारत असल्यानेच ती उदंड हाेत आहे. मागील काही वर्षांत वेगवेगळ्या प्रकारच्या अतिक्रमणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यावरून सर्वसामान्यांचा प्रशासनाविषयी रोष वाढत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीला शहरात हॉटेल व्यवसाय तेजीत असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता मार्जिनल स्पेसचा वापर करण्यासह हॉटेललगतच्या मोकळ्या जागा व पार्किंग ही बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले आहे. या ठिकाणी ग्राहकांच्या बैठकीची सोय करून संबंधित जागेचा व्यावसायिक वापर करण्यावर जोर दिला जात आहे. याकरिता सरसकट सर्वच हॉटेल व्यावसायिकांमध्ये स्पर्धा लागल्याचे पहायला मिळत आहे. तर काहींनी मोक्याच्या जागा शोधूनच हॉटेल सुरू केले आहेत. त्यांच्याकडून पदपथ अथवा सोसायटीच्या आवारातील मोकळी जागादेखील बंदिस्त करून घेतली जात आहे.

पदपथ, रस्त्यांवर अतिक्रमण काही हॉटेल्सवाले व खाद्यपदार्थांची विक्री करणारे रस्ते, पदपथ अडवून बिनदिक्कतपणे व्यवसाय करत असल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत दिसून आले. हॉटेल्सच्या काही वस्तू विक्रीसाठी तसेच ग्राहकांना बसवण्यासाठी पदपथाचा वापर केला जात असून हॉटेल्सवाल्यांना महापालिका प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही. पदपथासह रस्त्यावरच थेट हॉटेल्स तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पदपथ हे नेमके कोणासाठी? या हॉटेल्स व खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांसाठी की पादचाऱ्यांसाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...