आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकॉन पुरस्कार प्रदान सोहळा:अशोक बागवेंच्या हस्ते करंजीकर, रानडे, होळकर यांना पुरस्कार

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वारकऱ्यांचा सावळा विठ्ठल पंढरपुरी असतो तसाच आमचा गोरा विठ्ठल अर्थात वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज हे इथे नाशिकला असायचे आणि म्हणूनच नाशिकमध्ये असलेल्या या अष्टावधानी जनस्थानचेे मला विशेष कौतुक वाटत. निसर्गाने समृद्ध केलेल्या कलांमधून माणूस म्हणून आपण समृद्ध व्हायला हवे असा संवाद ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी साधला.

'जनस्थान'च्या वतीने प्रसिद्ध अभिनेते-लेखक, अर्थतज्ञ दीपक करंजीकर, ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या चळवळीचे प्रणेते विनायक रानडे, सुप्रसिद्ध कवी- गीतकार प्रकाश होळकर यांना बागवे यांच्या हस्ते आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते. प. सा. नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात बागवे म्हणाले की, 'जनस्थान' हे अष्टावधानी आहे. पाच कलांचा संगम असलेला हा सोहळा केवळ अद्वितिय आहे. कलाकारांचा उत्साह वाढवणारा आहे. दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी स्वतःला विसरून समर्पित करून काम करणारे आज-काल दुर्मिळ आहेत असेही बागवे म्हणाले. यावेळी अभय ओझरकर, स्वानंद बेदरकर, विनोद राठोड उपस्थित होते.

वॉचमनपासून ते ड्रायव्हरचा पुरस्कार

ग्रंथ मित्र म्हणून काम करताना अनेक लेखकांना, कवींना वाचकांपर्यंत पोचवणारा मी फक्त हमाल आहे. जनस्थान हा परिवार असा आहे की जिथे व्यासपीठावर आणि प्रेक्षागृहात दोन्हीकडे सगळे ‘आदरणीय’ बसले आहेत. अशा मनाने मोठ्या आणि दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या मंडळींमध्ये मिळणारा हा पुरस्कार ग्रंथपेटी भरणाऱ्या वॉचमनपासून, ती वाहून येणाऱ्या ड्रायव्हरचा, ती वितरित करणाऱ्या माझ्या मित्र परिवाराचा असल्याचे पुरस्कारार्थी विनायक रानडे यांनी व्यक्त केले.

तात्यासाहेब मला यशवंत म्हणायचे

कवी प्रकाश होळकर यांनीही तात्यासाहेबांची आठवण काढली आणि ‘तात्यासाहेब मला यशवंत म्हणायचे’ हे आवर्जून सांगितलं. “सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला गुरु चांगले लाभले, ज्यांनी माझ्या कवितेची पहिल्यांदा छाटणी केली म्हणून मला वास्तववादी कविता करण्याची दृष्टी लाभली आणि माझ्या कवितेला बहर आल्याचे कवी प्रकाश होळकर म्हणाले.

सृजनातून बकालता कमी

सृजनाचे सोहळे जेवढे जास्त होतात तेवढी समाजातली बकालता कमी होते. सृजनाचा आधार घेऊन जगणं यातच जगण्याचे उत्तर आहे. ज्या ज्या जाणिवांनी आपण अस्वस्थ होतो, त्यातून कलानिर्मितीची जिद्द आपल्याला संपन्न बनवते पण त्यासाठी आपलं कुतूहल जागृत ठेवायला हव कारण कुतूहल सृजनता जन्माला घालतो. झाड मोठ झालं तरी आपण झाडाला नाही तर झाडाच्या मुळांना पाणी घालतो कारण मूळ एकमेकांमध्ये गुंतलेली असतात, एकमेकांना धरून असतात आणि हीच प्रेरणा आजच्या या पुरस्काराने मला दिली असल्याचं दीपक करंजीकर यांनी मनोगतात सांगितलं.