आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंविधानानुसार सर्वाेच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला तर शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिनाही बघणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाेबत नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात गेल्यानंतर राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याची जाणीव झाली. मुख्यमंत्र्यांसह पाच ते सहा मंत्र्यांवर भूखंड तसेच अन्य कारणांमुळे गंभीर ताशेरे आेढल्यानंतरही राजीनामा देण्याची नैतिकता दाखवली जात नाही, ही शाेकांतिका असल्याची खंत राऊत व्यक्त केली.
नाशिक दाैऱ्यावर असलेल्या राऊत यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर जाेरदार टीका केली. ते म्हणाले की, अधिवेशनकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांच्यासारख्या मंत्र्यांवर गंभीर आराेप झाले. मात्र गेंड्याची कातडी पांघरल्यागत त्याकडे दुर्लक्ष केले गेले. विशेष म्हणजे, सत्ताधारी साेडून विराेधकांनाच गुन्हेगार ठरवले जात आहे. यापूर्वी मुख्यमंत्री असताना बॅरिस्टर अंतुले, शिवाजीराव निलंगेकर यांनी पद साेडण्याची नैतिकता दाखवली. मात्र ही नैतिकता आताच्या सत्ताधाऱ्यांमध्ये नाही, अशी टीकाही खा. राऊत यांनी केली.
सेनेतील कचरा उचलण्याचे शिंदे गटाचे काम
नाशकातून तसेच राज्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक शिंदे गटात जात असल्याबाबत विचारले असता, राऊत म्हणाले की, सेना हा वटवृक्ष आहे. कचरा पडला की शिंदे गट उचलून नेतो. या कचऱ्यासमाेर मुख्यमंत्री भाषणही करतात. कचऱ्याचा वापर आग लावण्यासाठी हाेताे व पुढे त्याचा धूर हाेताे, अशीही टिप्पणी राऊत यांनी केली.
मंत्रिपद जाण्याच्या भीतीने राणे बेताल
राऊत यांनी राणे यांच्यावर जाेरदार टीका करताना केंद्रीय मंत्रिपद धाेक्यात आल्यामुळे ते बेताल झाल्याचा आराेप केला. शिंदे गटातील खासदारांना मंत्रिपद हवे असल्यामुळे तसेच राणे यांची कामगिरी सुमार असल्यामुळे त्यांचे पद जाणार असल्याचाही दावा केला. हिंमत असेल तर राणे यांनी समाेरासमाेर यावे, आम्ही कुणाला घाबरत नाही, असे आव्हानही त्यांनी दिले. उद्धव ठाकरे यांच्याशी राणे यांची माझ्यानिमित्ताने भेट हाेत असेल तर आनंदच असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे कुटुंबावर केलेली टीका विसरणार नाही, असेही सांगितले.
संजय राऊत यांना उद्धव चपलेने मारतील : मंत्री राणे
मुंबई| संजय राऊत शिवसेना संपवायला निघाला आहे. मला रश्मी ठाकरे व उद्धव यांच्याबाबत काही गोष्टी राऊतने सांगितल्या आहेत. मी उद्धव ठाकरे यांना एक ना एक दिवस भेटून सर्व सांगणार आहे. त्यानंतर ते राऊत यांना चपलेने मारतील, असे धक्कादायक वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. भाजप आमदार राम कदम यांनी काशीसाठी मुंबईतून मोफत ट्रेन सोडली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून या ट्रेनने तीन हजार प्रवासी काशी यात्रेसाठी रवाना झाले. या वेळी राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेली नाही. ही सुपारी राऊतने घेतली आहे. आता शिवसेनेत कुणी उरलेले नाही. याचा आनंद राऊतला होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.