आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:उत्तरपत्रिकांची पुन्हा पुनर्तपासणी; प्र-कुलगुरूंचे विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना आश्वासन

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधी शाखेच्या विशिष्ट विषयांतच नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज केल्यानंतर त्यातही काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तफावत येत असल्याने या विद्यार्थ्यांनी थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. कारभारी काळे यांची भेट घेतली. यावेळी सत्य परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर लागलीच त्यांनी रिव्हॅल्युशन केलेल्या अन् त्रुटी किंवा पुन्हा गुणवाढीस वाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुनर्तपासणी करण्याचे आश्वासन दिले.

त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला असून विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच पुनर्मूल्यांकन झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जाणार आहेत. विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी बुधवारी पुणे येथे कुलगुरू डाॅ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डाॅ. संजीव सोनवणे आणि कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यावेळी तुषार दोंदे, शशी उन्हवणे, सुनील निरभवणे, शाकीर कुरेशी, सोनाली कुमावत आदी उपस्थित होते.

तथ्य तपासून रिव्हॅल्युएशन झालेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी करू
रिव्हॅल्युशन हे अगदी सोपं आहे. उत्तरपत्रिकेची झेराॅक्स विधीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून तपासून घेतली जाते. त्यानुसार ती घेतली जाईल. जर माॅडेल अन्सरनुसार त्यात काही फरक असेल तर त्यातील तथ्य तपासून मगच रिव्हॅल्युएशन झालेल्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी केली जाईल. यासाठी आधी बोर्ड आॅफ एक्झामिनेशनसमोर हा प्रस्ताव मांडला जाईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. - डाॅ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू, फुले विद्यापीठ

कायद्यात एकदाच पुनर्मूल्यांकनाची तरतूद
कायद्यात एकदाच पुनर्मूल्यांकनाची तरतूद आहे. त्यात १० ते २० टक्के गुणांमध्ये फरक आले तरच त्यावर कुलगुरू निर्णय घेतील असे मला वाटते. सरसकट रिव्हॅल्युएशन झालेल्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याच्या निर्णयाची मला कल्पना नाही. - डाॅ. काकडे, परीक्षा नियंत्रक, फुले विद्यापीठ

उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याचे आश्वासन
विद्यार्थ्यासह आम्ही पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिवांची भेट घेतली. त्यांनी रिव्हॅल्युशनमध्ये ५ ते १० गुणांचा फरक असेल तर अशा उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याबाबत आश्वासित केले आहे. त्याचा फायदा आता विद्यार्थ्यांना होईल. - अॅड. अजिंक्य गिते, विद्यार्थी प्रतिनिधी

बातम्या आणखी आहेत...