आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागाेंदे औद्योगिक वसाहतीतील मुंढेगाव येथील जिंदाल पाॅलिफिल्म्स कंपनीत रविवारी (दि.१) सकाळी ११.३० च्या सुमारास भीषण स्फाेट हाेऊन लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. केमिकल स्टाेअरेजमधून गळती हाेऊन रिअॅक्टरचा स्फाेट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथिमक अंदाज आहे. १२ तासांपेक्षा अधिक काळ अग्नितांडव सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत, तर जखमींवर माेफत उपचार हाेतील, असे जाहीर केले. त्याचप्रमाणे घटनेच्या चाैकशीचे आदेशही दिले. कंपनीत पाॅलिफिल्मसचे वेगवेगळे पाच विभाग आहेत. पाऊच, पाणी बाॅटल्सच्या बारीक फिल्म बनविल्या जातात. कंपनीतील टर्बाइनमध्ये प्रक्रिया सुरू असताना काहीतरी चुकीचे घडल्याने हा स्फाेट झाल्याचा अंदाज आहे. कंपनीत झालेल्या स्फाेटात अंजली यादव व महिमा या दाेघींचा मृत्यू झाला आहे. तर अन्य वीस जण जखमी झाले आहेत.
१२ तास उलटूनही आगीचे लाेळ कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेबरोबरच नाशिक महापालिकेचे १० बंब, इगतपुरी नगरपालिका, घाेटी, एचएएलचे तीन बंब, आर्टिलरी सेंटरचे काही बंब असे जवळपास २५ हून अधिक बंबांद्वारे आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र, बारा तास उलटूनही मुंबई- आग्रा महामार्गावर कंपनीच्या आसपास दहा ते बारा किलाेमीटरवरून आगीचे लाेळ दिसत हाेते.
३० हून अधिक रुग्णवाहिका दाखल : घाेटी टाेलनाक्यावरील रुग्णवाहिकांसह घाेटी ग्रामीण रुग्णालय, इगतपुरी नगरपालिका, मविप्रचे आडगाव येथील रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच १०८ क्रमांकांसह काही सामाजिक संस्था अशा जवळपास ३० रुग्णवाहिका दाखल झाल्या हाेत्या. जखमींना नाशिकच्या सुयश हाॅस्पिटलमध्ये उपचारासठी दाखल करण्यात आले. आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमातील स्वयंमसेवक त्र्यंबकेश्वर येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यांनीही तत्काळ घटनास्थळी पोहचून गर्दी व्यवस्थापनासाठी मदत केली.
मुख्यमंत्री, पालकमंत्री, आराेग्यमंत्र्यांची धाव : घटनेनंतर सिल्लोड दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पालकमंत्री दादा भुसेही सिल्लाेडहून मुंढेगाव येथे दुपारी ३.१० वाजता पोहोचले. तसेच केंद्रीय आराेग्य मंत्री डाॅ. भारती पवार यांनीही धाव घेतली. भुसे यांनी घटनास्थळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आग विझविण्याला प्राधान्य देण्यास सांगितले. तसेच घटनेची बारकाईने चाैकशी केली जाईल, असे सांगितले. पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी डी. गंगाधरण, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, घाेटी पाेलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींची नावे : राकेश सिंग, गणेश यादव, हिरामण यादव, पभित्रा माेहंती, सर्जित कुमार, कैलास कुमार सिंग, शामसुंदर यादव, श्रद्धा गाेस्वामी, याचिका कटियार, पूजा सिंग,अब्बू जालीम, मनाेज पाठक, लखन सिंग, गजेंद्र पालसिंग, सूर्याकुमार रावत.
विमान मार्गात बदल : ढगात धुराचे लोट परसल्याने मुंबई-दिल्ली मार्गात काही काळ बदल केल्याची चर्चा होती, मात्र त्याला दुजोरा नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.