आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔदुंबरनगर, अमृतधाम येथील शीतल विकी कांबळे या गर्भवती दुपारी १ वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असताना त्यांना अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यांनी थाेडा धीर धरला मात्र कळा असह्य हाेत असल्याने रस्त्यालगतच असलेल्या एका झाडाखाली त्या बसल्या. त्रास वाढतच असल्याचे त्याच परिसरातील काही महिलांच्या लक्षात आले. महिलांनी तत्काळ परिसरातील डाॅक्टरांशी संपर्क साधला. डाॅक्टरांनीही तत्काळ दाखल हाेऊन महिलेची त्याच ठिकाणी इतर महिलांच्या मदतीने सुखरूप प्रसूती केली. जुळ्या मुलींचा पहिला ट्याऽऽहा हाेताच महिलांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
काही कामानिमित्त शीतल कांबळे या दुपारी घराबाहेर पडल्या. मात्र, रस्त्यातच त्यांना प्रसूतीकळा सुरू झाल्या. कळा असह्य हाेत असल्याने त्या रस्त्यालगत असलेल्या झाडाखाली बसल्या. परिसरातील महिलांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ डाॅ. राजेंद्र बोरसे आणि माजी नगरसेविका प्रियंका माने यांच्याशी संपर्क साधला. डाॅ. बोरसे आणि नगरसेविका माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलांच्या मदतीने डाॅ. बोरसे यांनी त्या झाडाखालीच महिलेची सुखरूप प्रसूती केली. महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला आणि सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास साेडला. दाेन्ही मुली आणि त्यांच्या आईची प्रकृती सुखरूप असली तरी शीतल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिलेची रस्त्यावर प्रसूती होत असताना माने यांनी मनपा आरोग्य केंद्राचे डाॅ. बस्ते, परिचारिका वैशाली धिवर, छाया जाधव यांना आपल्या वाहनातून घटनास्थळी आणले. पंचवटी वैद्यकीय अधिकारी डाॅ. विजय देवकर यांच्याशी संपर्क साधून प्रसूतीची माहिती दिली. धनंजय माने यांनी रुग्णवाहिका बोलावून प्रसूत महिला व जुळ्या मुलींना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.