आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तिप्रदर्शन ​​​​​​​:बंडखोर मंत्री, आमदारांची शिवसेनेतर्फे आज तिरडी; नाशिक शिवसेना करणार मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन ​​​​​​​

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील जवळपास ३७ विद्यमान आमदारांसह बंड करून राज्यातील सत्ता उलथवण्याचे प्रयत्न सुरू केल्यामुळे नाशिक शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून रविवारी (दि. २६) बंडखाेर मंत्री व आमदारांची तिरडी काढून थेट जुने नाशिक येथील अमरधाम स्मशानभूमीत दहन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, शिवसेना कार्यालयावरून माेर्चाद्वारे तिरडीला सुरुवात हाेणार असून त्यातून नाशिक शिवसेना बंडानंतरही एकसंघ असल्याचे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

शालिमार येथील शिवसेना भवन येथे कोअर कमिटी पदाधिकारी तसेच प्रमुख माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची शनिवारी दुपारी बैठक झाली. शिंदे यांनी आमदारांसह बंड केल्यानंतर गेल्या तीन दिवसांत नाशिकमध्ये माेठ्या घडामाेडी घडत असून शिंदे यांचे निकटवर्तीय असलेल्या जवळपास २० माजी नगरसेवकांची कोंडी झाली आहे. शिवसेनेत रहायचे की शिंदे यांना समर्थन द्यायचे, असा पेच आहे. मात्र तूर्तास जवळपास सर्वच पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी शिवसेनेसोबत एकसंघ राहण्याचा निर्धार केला आहे.

शुक्रवारी शिंदे यांच्या काही समर्थकांनी नाशिकमध्ये बंडखोरांचे अभिनंदन करण्याबाबत लावलेले होर्डिंगही आक्रमक शिवसैनिकांनी काळी शाई फेकत फाडून टाकले होते. तसेच शिंदे समर्थकांना शिवसेनेचा नाद करू नका, असे आव्हानही दिले होते. दरम्यान, गेल्या दाेन दिवसांत शिवसेना कार्यालयात शिवसैनिक ठाण मांडून असून बंडखोरांना उत्तर देण्याची रणनीती आखली जात आहे.

शुक्रवारी शिवसेना कार्यालयात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकसंघ असल्याची ग्वाही दिली होती. आता रविवारी सकाळी जुने नाशिक येथील अमरधाम येथे तिरडी मोर्चा काढून बंडखोरांचा निषेध केला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नाशिक व नाशिकरोड येथे शिवसैनिकांनी या बंडाचा निषेध केला असून शिंदे समर्थकांनी लावलेल्या फलकाला काळे फासले होते. शनिवारीही बंडखोरांना निषेध केला गेला.

कांदे यांच्या समर्थकांचे शिवसेनेला आव्हान
एकीकडे राज्यातील अनेक सेना आमदारांच्या कार्यालयावर हल्ले होत असताना नाशकात मात्र नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर जमत घोषणाबाजी केली. एकप्रकारे शिवसेनेला आव्हान देत कांदे यांचे समर्थन केल्याची बाब चर्चेचा विषय ठरली.