आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामोजी फिल्मसिटी:25 कोटी रुपये खर्चून होणार फाळके स्मारकाचे पुनर्निर्माण ; डीसीपीकडून पर्यटन निधीसाठी प्रस्ताव

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अत्यंत मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या पाथर्डी फाट्यावरील २९ एकर जागेत खितपत पडलेल्या फाळके स्मारकाचे हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर पुनर्निर्माण केले जाणार असून पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे आता जिल्हा नियोजन समितीतील पर्यटन निधी अंतर्गत २५ कौटी रुपयांचा निधी मागण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. सर्वसाधारणपणे २५ कौटी खर्चाची मर्यादा निश्चित करून रामोजी फिल्मसिटीमधील कौणकौणत्या प्रमुख बाबी फाळके स्मारकात साकारता येतील याची चाचपणी केली जाणार असून त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. १९९९-२०००मध्ये त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या २९ एकर जागेत उभारलेल्या फाळके स्मारकाची दुर्दशा झाली. सुरुवातीच्या काळात या प्रकल्पाला पर्यटकांनी डाेक्यावर घेतले होते. नाशिकमध्ये येणाऱ्यांची पावले आपोआपच फाळके स्मारकाकडे वळत होती. येथील संगीत कारंजा, उद्यानही आकर्षणाचे केंद्र होते. दरम्यान, पुढे हा प्रकल्प पालिकेसाठी पांढरा हत्ती पोसण्यागत ठरला. उत्पन्न कमी व देखभाल खर्चच वाढत गेल्यामुळे फाळके स्मारकाची अवस्था दयनीय होत गेली. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी एकाही सत्ताधारी पक्षाला राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवता आली नाही. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर चालवण्यासाठी देण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवली. त्यात एनडीज् आर्ट वर्ल्ड यांचे देकार पात्र ठरल्याने त्यांना काम देण्याचा निर्णय झाला, मात्र यात लेखापरीक्षकांनी संबंधित व्यवहार हा ठेकेदारासाठी पोषक तर पालिकेसाठी नुकसानकारक ठरल्याचा अहवाल दिला. ही बाब लक्षात घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी फाळके स्मारकाचे खासगीकरण राेखले होते. आता हा प्रकल्प पालिकेमार्फत व्यवस्थापन करण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी घेतला असून त्यांनी त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद डीपीसी अर्थातच जिल्हा नियाेजन समितीकडून करण्याची तयारी सुरू केली आहे.

१० वर्ष : १०.६० कोटी तोटा; पुनर्विकासासाठी २० कौटी खर्च महापालिकेला या प्रकल्पातून दरवर्षी सरासरी ५३ लाखांचा तोटा होत आहे. गेल्या २० वर्षांत आतापर्यंत महापालिकेला या प्रकल्पातून १० कौटी ६० लाख रुपयांचा तोटा झाला. दरम्यान, या स्मारकाच्या पुनर्विकासासाठी सुमारे १८ ते २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे एनडीज् आर्ट वर्ल्डतर्फे महापालिकेला देण्यात आलेल्या प्रस्तावात म्हटले होते. इतका खर्च करून संबंधित ठेकेदार ३० वर्षांच्या कालावधीत महापालिकेला रॉयल्टीपोटी केवळ ८.३७ कोटी रुपये देणार होता. पालिकेची मोक्याची जागा इतक्या प्रदीर्घ काळासाठी न देता डीपीसीतील निधीतून पुनर्निर्माण केल्यास वाद टळणार आहे. त्यामुळे आयुक्त पवार यांचे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...