आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद वार्ता:पालिकेत जानेवारीमध्ये 706 जागांसाठी भरतीच्या हालचाली

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल २४ वर्षांनंतर नाशिक महापालिकेत अग्निशमन विभागातील ३४८ तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठीच्या भरतीचा बिगुल वाजणार असून आयबीपीपीएस या कंपन्यांनी संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी तयारी दर्शवल्यामुळे आता ही प्रक्रिया पूर्ण करून जानेवारी महिन्यामध्ये नोकरभरती करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

त्यामुळे नवीन वर्षामध्ये स्थानिकांना महापालिकेच्या माध्यमातून कायमस्वरूपीचा रोजगार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.नाशिक शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून शहराची लोकसंख्या २० लाखावर गेली आहे. वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला मनुष्यबळाची गरज असताना गेल्या २४ वर्षांपासून महापालिकेत नोकरभरती झालेली नाही.

दुसरीकडे मात्र रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ३५ टक्के आस्थापना खर्च असेल तरच नोकरभरती करण्याबाबत शासनाचे निर्देश आहे. अलिकडेच ही अट देखील नाशिक महापालिकेने पूर्ण केली होती, मात्र लवकर भरतीसाठी आवश्यक सेवा प्रवेश नियमावली २०१७ पासून राज्याच्या नगरविकास खात्याकडे पडून होती. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी पाठपुरावा केल्यानंतर सुधारित आकृतिबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली होती.

त्यातील अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली होती. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला होता. राज्य शासनाने या पदांची भरती कोणत्या संस्थेमार्फत करावी यासंदर्भातील निर्देश दिले नव्हते. त्यानंतर सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, क, ड या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस), आयबीपीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांशी महापालिकेने पत्रव्यवहार करून भरतीसाठी सविस्तर प्रस्ताव मागवले होते.

त्यापैकी आयबीपीएस संस्थेने महापालिकेत वैद्यकीय व अग्निशमन विभागात रिक्त पदांची भरती करण्याची तयारी दर्शवली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेचा प्रस्ताव सादर झाला नाही. त्यामुळे आयबीपीएस संस्थेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

..तर दोन हजार पदांसाठी भरती
सद्यस्थितीत आरोग्य, वैद्यकीय आणि अग्निशमन विभागातील ७०६ पदांची भरती प्रक्रिया सुरू हाेणार असून उर्वरित २००० पदांसाठीचीही प्रलंबित सेवा प्रवेश नियमावली मंजुरीनंतर पुढील प्रक्रिया होईल. ही नियमावली मंजूर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाला आदेश दिले.

आयबीपीएसमार्फत भरती
अग्निशमन व वैद्यकीय विभागातील भरतीसाठी आयबीपीएस संस्थेमार्फतच जानेवारी महिन्यात भरती प्रक्रिया सुरू करू. - मनोज घोडे-पाटील, उपायुक्त, प्रशासन.

बातम्या आणखी आहेत...