आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती प्रक्रिया:महापालिकेत 706 पदांसाठी 15 दिवसांत भरती प्रक्रिया

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर महापालिकेतील नोकरभरतीच्या हालचाली गतिमान झाले असून पुढील पंधरा दिवसांमध्ये प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रशासनाला दिले. ७०६ पदांसाठी टीसीएस तसेच आयबीपीपीएस या २ कंपन्यांपैकी एकाकडून भरती होणार आहे.

महापालिकेची ‘ब’ वर्गात पदोन्नती झाली असली तरी २४ वर्षांपासून महापालिकेत कुठलीही नोकरभरती झालेली नाही. महापालिकेत ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७०८२ इतकी असून नानाविध कारणांमुळे पालिकेतील रिक्त पदांची संख्या २६०० वर गेली आहे. पालिकेत सद्यस्थितीत जेमतेम ४५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.

दुसरीकडे, ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे. मध्यंतरी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी पाठपुरावा केल्यानंतर ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली होती. मात्र, भरतीसाठी आवश्यक महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून होती. याबाबत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी अग्निशमन विभागातील ३४८ आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली होती. आता ही भरती प्रक्रिया पंधरा दिवसांत सुरू केली जाणार आहे.

..तर २००० पदांसाठी भरती
सेवा प्रवेश नियमावली मंजूर असल्यामुळे सद्यस्थितीत ७०६ पदांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित दोन हजार पदांसाठीचीही प्रलंबित असलेली सेवा प्रवेश नियमावली मंजूर झाल्यास संबंधित दोन हजार पदे भरता येतील.

बातम्या आणखी आहेत...