आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वावर 11 ते 17 ऑगस्टदरम्यान घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन केले. मात्र, शेतकरी म्हणून स्वातंत्र्य मिळाले नसल्याने या उत्सवात सहभागी होणार नसल्याची भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे. या निषेधपर भूमिकेची लक्षावधी पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याना पाठविण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.
नाशिक येथे अनिल घनवट म्हणाले की, एक भारतीय म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अभिमानच वाटतो. मात्र एक शेतकरी म्हणून स्वातंत्र्य मिळाले नसल्याचा खेद आहे. भारतीय शेतकऱ्यांना आजही व्यवसायाचे, तंत्रज्ञानाचे, जमीन किंवा संपत्ती विस्ताराचे स्वातंत्र्य नाही. देशातील शेतकऱ्यांचे पारतंत्र्य संपलेले नाही. लाखो शेतकऱ्यांनी या गुलामीतल्या जगण्याला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे. म्हणून सरकारच्या हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले.
75 वर्षानंतर तरी शेती क्षेत्राला व शेतकऱ्यांना लुटणारे धोरण बदलून स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा घनवट यांनी आज मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. तसेच शेतकऱ्यांना अशी अधिकाधिक पत्रे पाठविण्याचे आवाहनही केले आहे.
गतकाळात शेतकऱ्यांचे शोषणच झाले. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. ही बाब सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी व धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी असे पत्र शासनाला पाठवावे असे सांगितले. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले हे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.