आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय:जन्मशताब्दी वर्षातही वामनदादांचे स्मारक होऊ नये हे खेदजनक; कवी आहिरे यांची खंत

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वामनदादांनी हजारो गीतरचना लिहून आपल्या सुमधूर अशा पहाडी आवाजातून परिवर्तनचा जागर आयुष्यभर मांडला. परंतु या क्रांतीदर्शी महाकवीचे उचित स्मारक त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्येही पुरोगामी महाराष्ट्रात अस्तित्वात येऊ नये; हे खेदजनक असल्याचे मत लेखक, कवी प्रा. गंगाधर आहिरे यांनी व्यक्त केले.

नाशिकरोड येथील मातृभूमी प्रबोधन समिती आणि म. फुले सा. वाचनालय व ग्रंथालयातर्फे आयोजित केलेल्या वामनदादांच्या जन्मशताब्दी समाप्ती सोहळ्यात मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोपीचंद पगारे होते.

'वामनदादांच्या क्रांतीदर्शी शाहिरीचे परिवर्तनाच्या चळवळीतील योगदान ' या विषयावर बोलताना प्रा. अहिरे पुढे म्हणाले की, जागतिक स्तरावर मानवतावादी मूल्यांच्या रुजवणुकीसाठी झालेल्या क्रांतिकारी चळवळींमध्ये शाहिरांची सामीलकी अग्रभागी असल्याचे दिसून येते. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि स्वतंत्र भारतात लोकशाही व्यवस्था प्रस्थापित करण्यातही शाहिरांची कृतीप्रवणता मोलाची ठरलेली आहे. महाकवी वामनदादांच्या शाहिरीचे त्यामध्ये राहिलेले अढळस्थान हे क्रांतीदर्शी स्वरुपाचे असल्याचे निदर्शनास येत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

समारंभाचे प्रास्ताविक म. फुले सा. वाचनालय व ग्रंथालयाचे सेक्रेटरी नंदकिशोर साळवे यांनी केले. विचारपीठावर संस्थेचे पदाधिकारी श्यामराव बागूल, संस्थेचे सेक्रेटरी जयंत बोढारे, संतोष जोपूळकर उपस्थित होते. प्रारंभी वामनदादा व महापुरूषांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

पाहुण्यांचे स्वागत विजय होर्शील, कुणाल शेजवळ यांनी केले. शामराव बागूल यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. नंदा बागूल, सरलापगारे व रोहीणी जाधव यांचे हस्ते बोधी वृक्षाचे पूजन करण्यात आले. चंद्रमोरे यांनी राष्ट्रभक्तीपर गीत गायन केले. संस्थेचे अध्यक्ष गोपीचंद पगारे यांनी या प्रसंगी समयोचित मनोगत व्यक्त केले. समारंभाचे सूत्रसंचालन सुनील बर्वे यांनी केले. तर विजय होर्शील यांनी उपस्थितांचे आभार मानले. समारंभास रोहिनी जाधव, भालशंकर, राजेंद्र चंद्रमोरे, पी. के. गांगुर्डे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रा. गंगाधर अहिरे म्हणाले की, प्रबोधनाच्या चळवळीत महाकवी वामनदादांचे योगदान दिपस्तंभासारखे आहे. फुले-शाहू-आंबेडकरांनी प्रसविलेल्या मानवमुक्तीच्या विचारधनाचा प्रचार व प्रसार वामनदादांनी सहजसुलभ बोलीतील आपल्या गीतांमधून केला. म्हणूनच त्यांची शेकडो गीतं आजही बहुजनांच्या अंतःकरणात सामावलेली आहेत. त्यांच्या गीतांमधील मानवधर्मी विचारदर्शन वर्तमानातही दिशादर्शक असल्याचे त्यांनी मांडले.

बातम्या आणखी आहेत...