आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवणूक:शहरातील ३३ स्मार्ट पार्किंग स्लॉटचे भाडे वाढणार; नाशिककरांवर संकट

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठेकेदाराच्या प्रस्तावासमोर स्मार्ट सिटीचे लोटांगण

दोन वर्षांपासून वादात असलेले शहरातील ३३ स्मार्ट पार्किंग स्लॉट सुरू करण्यासाठी अखेर स्मार्ट सिटी कंपनीने वादग्रस्त ठरलेल्या ट्रायजेन कंपनीपुढे लोटांगण घातले असून ठेका रद्द करण्याची नोटीस दिल्यानंतरही कंपनी मागे न हटल्यामुळे अखेर तिप्पट पार्किंग शुल्कवाढ आणि तीन वर्षांच्या मुदतवाढीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संचालक मंडळाने आता आयुक्तांना दिला आहे. त्यामुळे नाशिककरांवर स्मार्ट पार्किंग शुल्क महागण्याचे संकट आहे.

झपाट्याने विकसित होणाऱ्या नाशिकमध्ये पार्किंगचा प्रश्न गहन झाला असून प्रमुख रस्त्यांवर वाहनतळाची सोय नसल्याने रस्त्यावरच बेशिस्तपणे वाहने लावली जात आहे. पालिकेच्या माध्यमातून वाहनतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र त्यात यश आले नाही. अखेरीस स्मार्ट सिटी कंपनीने पीपीपी तत्त्वावर स्मार्ट पार्किंग प्रकल्प सुरू केला असून, त्यात २८ ऑनस्ट्रीट, तर पाच ऑफस्ट्रीट पार्किंग सुरू केल्या आहेत. या ३३ ठिकाणच्या पार्किंगच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ट्रायजेन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीने कोरोनापूर्वी पहिल्या टप्प्यात २२ पार्किंग लॉट्स उपलब्ध करून दिले आहेत. दहा वर्षे शुल्क वसुलीसह दुचाकी वाहनांसाठी प्रति तास पाच, तर चारचाकी वाहनांसाठी १० रुपयांचा दर निश्चित केला होता.

मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांपासून स्मार्ट पार्किंग सुरू झालेले नाही. या बाबीवर बोट ठेवत ठेकेदाराने आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत दुचाकीसाठी प्रति तास १५, तर चारचाकीसाठी प्रति तास ३० रुपये शुल्कवाढीसह तीन वर्षांची मुदतवाढ तसेच टोइंग सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यात टोइंग सुविधा सुरू करतानाच पालिकेने दीड वर्ष मुदतवाढ देण्याचे मान्य केले. मात्र, कंपनी अडून बसल्याने स्मार्ट सिटी कंपनीने ठेका रद्द करण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी संचालक मंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवल्यानंतर नवीन ठेकेदार शोधण्यासाठी जाणारा वेळ व वाढणारा खर्च लक्षात घेत त्याच ठेकेदाराला तडजोड करून काम देण्याचा निर्णय झाला. कंपनीच्या मागण्यांबाबत चर्चा करण्याचे अधिकार संचालक मंडळाने आयुक्त कैलास जाधव यांना दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...