आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग - 1 मध्ये कार्यरत कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्यावर कारवाईसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे व इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे आमदार हिरामण खाेसकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून लाेकप्रतिनिधींचा कारवाईसाठी शासन - प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू असताना कार्यकारी अभियंत्यांवर काेणताही परिणाम झालेला नाही.
प्रकरण मागे पडले
बांधकाम विभाग -1 मध्ये कामे वाटपात हाेत असलेल्या अनियमिततेमुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसाेड यांनी काेट्यवधींच्या कामांना स्थगिती देऊन कार्यकारी अभियंता कंकरेज यांना कारणे दाखवा नाेटीस बजावून सात दिवसात खुलासा मागविला हाेता. मात्र नाेटीस बजावल्यानंतर बनसाेड यांची बदली झाल्याने हे प्रकरण मागे पडले. परिणामी कार्यकारी अभियंता पुन्हा निश्चिंत झाले आहे.
आ. खोसकरांची तक्रार
दरम्यानच्या काळात ग्रामविकास विभागाकडून मंजुर झालेली साडे आठ काेटींची कामे रद्द झाली आहेत. यासाेबतच आदिवासी उपयाेजनांच्या कामांचे वेळेत नियाेजन न झाल्यामुळे तीही कामे स्थगित ठेवण्यात आली आहे. मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे, परवाना नुतनीकरण करताना दुजाभाव करणे एकुणच कार्यकारी अभियंत्यांच्या या मनमानी कारभारामुळे आमदार खाेसकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तसेच उपाेषणाचा इशाराही दिला.
वरदहस्त कुणाचा?
विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे तक्रार करून आता विधानभसेत आवाज उठवण्याचा इशारा दिला. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी यापुर्वीच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनसाेड यांच्याकडे तक्रार केली हाेती. त्यांच्या पत्रानंतर बनसाेड यांनी चाैकशीही सुरू केली हाेती. मात्र त्यांची बदली झाल्याने हे प्रकरण झाकाेळले गेले हाेते. या अधिकाऱ्यावर नेमका वरदहस्त काेणाचा? याचा शाेध घेण्याचे काम आता लाेकप्रतिनिधींनी सुरू केले आहे.
आ. कांदेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
सबंधित मंत्र्यांसह प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई हाेत नसल्याचे बघून आमदार सुहास कांदे कमालीचे संतप्त झाले आहेत. त्यांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच कंकरेज यांच्याबद्दल लेखी तक्रार केली. कांदे हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांनीही तात्काळ दखल घेत ग्रामविकास विभागाच्या सचिवांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.