आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

134 शिक्षणक्रम:‘मुक्त’च्या 5 लाख विद्यार्थ्यांचे 30 दिवसांमध्येच निकाल ; उत्तरपत्रिकांचे अचूक मूल्यांकन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या १३४ विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यभरातील सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एवढी मोठी संख्या असतानाही अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अचूक मूल्यांकन पद्धतीमुळे परीक्षेनंतर केवळ ३० दिवसांत निकाल जाहीर करण्यात आले. याचा फायदा राज्यभरातील परीक्षार्थींना झाला.

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्या होत्या. २४ जून ते २४ जुलैदरम्यान झालेल्या या परीक्षांना राज्यभरातील विविध केंद्रांवर पाच लाख ४५ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. विविध १३४ शिक्षणक्रमांच्या परीक्षेनंतर २७ लाख ५६ हजार ८५४ उत्तरपत्रिका महिनाभरात तपासून निकाल जाहीर करण्याची मोठी जबाबदारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर होती. तथापि, अत्याधुनिक स्कॅनिंग पद्धती आणि त्यातून ऑनलाइन मूल्यांकन पद्धती काटेकोरपणे राबविण्यात आली. ऑनलाइन पेपर तपासणीसांच्या फेस डिटेक्शन आणि बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशनसह काळजी घेण्यात आली होती.

गुणांकन पद्धतीही ऑनस्क्रिन करण्यात येऊन त्याचे अंतिम डिजिटल मूल्यमापन करण्यात आले. यामुळे तब्बल साडेपाच लाख विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या २७ लाखांवर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केवळ एक महिन्यात करून निकाल ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शिक्षणाचे ध्येय पूर्ण करण्याची संधी निर्माण हाेत आहे. अनेकजण अनेक कारणांनी नियमित शिक्षण अर्धवट साेडतात. त्यांच्यासाठी मुक्त विद्यापीठ संजीवनी ठरत असल्याचे दिसून येते.

निकाल असा पहावा
विद्यार्थ्यांनी शिक्षणक्रमाच्या निकालासाठी विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर पीआरएन क्रमांक टाकल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. निकाल तयार करण्यासाठी विद्यापीठाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. कमी वेळात एवढ्या मोठ्या संख्येने उत्तरपत्रिकांची अचूक तपासणी करता आली, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख व परीक्षा नियंत्रक भटू प्रसाद पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...