आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:समित्यांवर निवृत्त न्यायाधीशांच्या नियुक्त्या करू नये, घेणाऱ्यानेही घेऊ नये : अॅड. निकम

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायव्यवस्थेविषयी नागरिकांच्या मनात जेव्हा किंतु-परंतु निर्माण हाेताे तेव्हा ती धाेक्याची घंटा आहे असे समजून घ्यायला हवे. खरे तर विविध समित्यांवर वा कामांसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नियुक्त्या केल्या जातात, त्या अजिबातच करायला नकाे. ज्यांची नियुक्ती हाेते त्यांनीच ती स्वीकारायला नकाे. साधनशुचितेचे महत्त्व ठेवले नाही तर मग न्यायव्यवस्थेविषयी संशय निर्माण हाेताे, असे परखड मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले. कुसुमाग्रज स्मारकात अ. भा. प्रकाशक संघाच्या चाैथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात विश्वास ठाकूर यांनी त्यांची मुलाखत घेतली.

न्यायव्यवस्थेवर सामान्यांचा विश्वास कमी हाेत चालला आहे का, या प्रश्नावर निकम म्हणाले, सामान्य माणसासाठी न्यायव्यवस्था म्हणजे शेवटचा आशेचा किरण असताे. त्यामुळे त्या व्यवस्थेवर काेणताही दबाव न आणता पारदर्शकता असायला हवी. प्रसारमाध्यमे काय बातमी देतात त्यावर मत बनवले जाते. अजूनही सामान्य माणूस स्वतंत्रपणे विचार करत नाही. चर्चा, बातम्या आणि जे दाखवलं जातं त्यावर ताे विश्वास ठेवताे आणि मग न्यायव्यवस्थेबाबत किंतू निर्माण हाेताे.

... आणि आबू सालेमच तुरुंगातून पत्र आलं : आबू सालेमचा खटला जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा माझ्या डाेक्यात ताे काही वेगळाच हाेता. आपण बघताे त्याच्या डाेक्यावर ती वेगळी टाेपी, दाढी वगैरे. पण ताे अत्यंत स्मार्ट मस्त हिराेसारखा हाेता. माझी एक पद्धत आहे की, मी त्याला बाहेर काय म्हणत असतील याचा अभ्यास करताे आणि अगदी पाठीवर हात वगैरे ठेऊन बाेलताे. त्यालाही मी क्या आब्या वगैरे म्हणत तब्येतीची चाैकशी वगैरे करायचो. गप्पा मारताना त्याच्याकडून खटल्यासाठीची माहितीही काढत. शेवटच्या दिवशी मी युक्तीवाद करताना ताे काेर्टात लालबुंद झाला हाेता. पण हे करत असताना त्याच्या मनात माझ्याबद्दल आपुलकी आणि आदर निर्माण झाला. माझी जेव्हा अॅन्जिआेप्लास्टी झाली तेव्हा आबू सालेमने मला तुरुंगातून पत्र पाठवत तब्येतीची चाैकशी केली, असा किस्साही निकम यांनी सांगितला.

छाेट्या पाेरांनी साखर वाटली ताे सर्वात मोठा आनंद
अॅड. निकम म्हणाले, मुलांना पळवणाऱ्या टाेळीतील अंजनाबाई, रेणुका आणि सीमा या खटल्याची सुनावणी काेल्हापुरात झाली. त्या वेळी लहान मुले आणि पालक खूप घाबरलेले हाेते. अंजनाबाई तर तुरुंगातच वारली हाेती. पण रेणुका आणि सीमा यांना शिक्षा झाली तेव्हा मी न्यायालयाच्या बाहेर येताच छाेट्या-छाेट्या पाेरांनी साखर वाटली. ताे माझ्या करिअरमधला सर्वाधिक आनंदाचा क्षण हाेता.