आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकअदालतमध्ये घडला समेट:पुन्हा जुळली 126 दांपत्यांची रेशीमगाठ; उच्चशिक्षित दांपत्य मुलाच्या प्रेमापोटी आले एकत्र

संदीप जाधव | नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसारात किरकोळ कारणांतून होणारे वाद थेट न्यायालयात पोहाेचतात. अशाचप्रकारे उच्चशिक्षित कुटुंब न्यायालयात घटस्फोटकरिता गेले. मात्र मुलाच्या प्रेमापोटी हे दांपत्य ६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. कुटंुबात लैंगिक अत्याचार, तोंडी आणि भावनिक अत्याचार, आर्थिक अत्याचार होत असतात. व्यभिचारपणामुळे कुटुंबात वाद होतात. हे वाद प्रथम पोलिस ठाण्यात आणि नंतर न्यायालयात दाखल होतात. पती-पत्नी न्याय मागण्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवतात.यात दोघांचेही मानसिक, आर्थिक नुकसान होते. अशा पीडित कुटुंबीयांसाठी राष्ट्रीय लोकअदालत महत्त्वाचा दुवा ठरली आहे. लोकअदालतीमध्ये १२६ कुटुंबीयांचा संसार पुन्हा फुलला.

लाेकअदालमध्ये आलेल्या प्रकरणांपैकी एक प्रकरण आहे उच्चशिक्षित दांपत्याचे. दाेघांचे नाशिकमध्ये लग्न झाल्यानंतर पती नोकरीनिमित्त परदेशात गेला. पत्नीला सोबत नेले. कालांतराने विवाहितेला दिवस गेले. मात्र दोघांमध्ये वाद मिटत नसल्याने लंडनच्या कुटंुब न्यायालयात प्रकरण गेले. महिलेला आपले बाळ भारतात जन्माला यावे, अशी इच्छा होती. पतीसोबत वाद घालून पत्नी भारतात परतली. तिने बाळाला जन्म दिला.

पुण्याच्या कुटुंब न्यायालयात पतीविरोधात घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. पतीचा मुलावर जीव असल्याने त्याने घटस्फोट देण्यास असमर्थ असल्याचे सांगत तडजोडीकरिता ताे तयार हाेता. मात्र पत्नी तयार नव्हती. पतीने २० लाख रुपये द्यावे,अशी तिने न्यायालयात मागळी केली हाेती.

न्यायालयाने पतीने पत्नीला २० लाख रुपये द्यावे, असे आदेश दिले होते. अॅड. प्रेमनाथ पवार हे पतीच्या बाजूने युक्तिवाद करत असताना दोघांमध्ये समेट घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पत्नीचे समुपदेशन केले. पत्नीने चार-पाच दिवस विचार करण्याची वेळ मागितली. दोघांमध्ये बैठक घेतली दोघांच्या मनात असलेले मतभेद दूर झाले.

पतीने पत्नीच्या नावे आणि मुलाच्या नावे प्रत्येकी १० लाखांची ठेव जमा केली. समेट झाल्यानंतर पैसे देण्याची आवश्यकता नव्हती, मात्र मुलाच्या प्रेमाने दोघे भावनिक झाले. दोघांनी एकमेकांची माफी मागत पुन्हा एकत्र आनंदात नांदण्याचे अश्वासन दिले.

समुपदेशनानंतर दांपत्य पुन्हा आले एकत्र
दोघांमध्ये किरकोळ मतभेद होते. उच्चशिक्षित असल्याने दोघेही समर्थ होते. दोघांच्या भांडणात कोवळ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न होता. पतीला विभक्त होण्याची इच्छा नव्हती. पत्नीला पुढे येणाऱ्या अडचणीबाबात समुपदेशन केले. मुलाच्या प्रेमापोटी दोघे पुन्हा नांदण्यासाठी एकत्र आले. - अॅड. प्रेमनाथ पवार

बातम्या आणखी आहेत...