आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​उफराटा कारभार:उलटे प्रशासन ‘खड्ड्यांत’ ; शहरातील बसस्थानकांमधूनच सुरू होतो खड्ड्यांतील प्रवास

नाशिक / सचिन जैन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वच बसस्थानके ही खड्ड्यात गेल्याने बसचालकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. शहरातील एकही बसस्थानक खड्ड्यांविना नाही. ठक्कर बाजार बसस्थानक आणि निमाणी बसस्थानक येथे तर बस पूर्ण चाक खड्ड्यात जाईल एवढे माेठे खड्डे पडलेले आहे. स्थानकांची मालकी एस.टी. महामंडळाची असली तर काही स्थानकांचा वापर महापालिकेकडे आहे. त्यामुळे स्थानकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी दाेन्ही विभाग एकमेकांकडे बाेट दाखवतात. कधीतरी खड्डे बुजविण्यासाठी केविलवाणी मलमपट्टी करण्याचा उलटा कारभार केला जाताे अन‌् परिस्थिती ‘जैसे थे’ हाेते. बसस्थानकांमधील खड्ड्यांबाबत राजकीय व सामाजिक संघटनांनी आंदोलनेदेखील केली. मात्र, एस.टी. महामंडळाचे लवकरच काम करणार असल्याचे पालुपद नेहमीच ऐकायला मिळते.

एसटी महामंडळाचे बाेट सिटी लिंककडे
पालिकेच्या सिटी लिंक बससाठी निमाणी बसस्थानकाचा वापर हाेताे. मात्र, या स्थानकाच्या दुरुस्तीकडे एस.टी. आणि सिटी लिंक एकमेकांकडे बोट दाखवतात. तर एस.टी.च्या वतीने विभागातील बसस्थानक दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधीचा खर्च दाखवला जातो. मात्र, बसस्थानकाच्या दयनीय अवस्थेबाबत अधिकाऱ्यांकडून हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतली जात आहे.

बसस्थानकातील छायाचित्रही उलटेच करून पहा...
पावसाळा जवळ आला की, रस्त्याची कामे करणे, भरपावसात डांबर टाकून खड्डे बुजवणे, खड्ड्यांमध्ये माती, गट्टू टाकून केविलवाणी मलमपट्टी करणे असे प्रकार महापालिका असाे, सार्वजनिक बांधकाम विभाग असाे की एसटी प्रशासन असाे सगळ्याच यंत्रणांकडून केले जातात. काेट्यवधींच्या चुराड्याचा हाच उलटा कारभार दाखवितानाच प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही ठक्कर बाजार बसस्थानकात असलेल्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यातील बसच्या प्रतिबिंबाचे हे छायाचित्र जाणीवपूर्वक उलटे छापत आहाेत. पेपर उलटा करून पाहिल्यास मूळ छायाचित्र पाहता येईल. छाया : अशोक गवळी

बातम्या आणखी आहेत...