आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लॉकडाऊनची बंदी, ठरली संधी; 17 जणांच्या रोज दोन तास श्रमदानातून 3 लाख लिटर क्षमतेच्या तलावाचे पुनरुज्जीवन

सिन्नर / संपत ढोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाणवठ्यानंतर आता अठराशे झाडांच्या घनवनासाठी राबताहेत हात

वर्षभरापूर्वीच्या कडक लाॅकडाऊन काळातही त्यांनी जिद्द सोडली नाही. उलट हा काळ बंदी नव्हे तर संधीचा ठरवून रोज दोन तास श्रमदान केले. त्यातून पाझर तलाव उकरला, वन्यप्राण्यांसाठी पाणवठा तयार केला. आता घनवन तयार करण्यासाठी ते मेहनत घेत आहेत. वनप्रस्थ फाउंडेशनचा तसा श्रमदानातून वृक्षलागवडीचा उपक्रम पाच वर्षांपासून सुरू आहे. आत्तापर्यंत आई भवानी डोंगरावर तीन हजार पाचशे झाडे लावली आहेत. या प्रत्येक झाडाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणीपुरवठ्याचीही सुविधा फाउंडेशनने केली आहे. विशेष म्हणजे यातील ९५ टक्के झाडे जगली आहेत. मात्र, मार्च २०२० पासून लाॅकडाऊनचा काळ त्यांनी संधीत रूपांतरित केला. रोज सकाळी आठ वाजेपासून दोन तास श्रमदान न चुकता सुरू ठेवले. डॉ. महावीर खिंवसरा, अभिजित देशमुख, दत्ता बोराडे, राजाभाऊ क्षत्रिय, अनिल जाधव, सचिन कासार, अतुल मिसाळ, संदीप आहेर, सचिन आडणे, सुमितसिंग राजपुरोहित, वैभव पवार, सौरभ आंबेकर, आर. बी. जाधव, आप्पा भिसे, संजय विसे, सोपान बोडके, पिंटू देशमुख अशी श्रमदान करणाऱ्यांची नावे आहेत.

व्हाॅल्व्हच्या गळतीतून वन्यप्राण्यांसाठी पाणवठा
सिन्नर नगरपरिषदेच्या कडवा जलवाहिनीच्या व्हाॅल्व्हमधून गळणारे पाणी जमा होईल अशा पद्धतीने पांढुर्ली घाटात पाणवठा तयार करण्यात आला. त्यासाठी अकरा दिवस मेहनत घेतली. दगड, मातीच्या सहाय्याने पाणी साठवून राहण्याची व्यवस्था केली. आता या पाणवठ्यावर दिवसा गाई, शेळ्या, मेंढ्यांसाठी तर रात्री वन्यप्राण्यांसाठी उपयोग होत आहे.

गाळाने बुजला होता तलाव : आई भवानी डोंगरमाथ्यावर गाळ साचून पाझर तलाव बुजला होता. श्रमदानाने त्यातून गाळाचा उपसा केला. पाझर तलावाच्या मातीबांधाची दुरुस्ती केली. आता किमान तीन लाखाहून अधिक लिटर क्षमता या तलावाची झाली आहे. या तलावाचा परिसराला चांगलाच फायदा होऊ लागला आहे.

घनवन निर्मितीचा उपक्रम
आई भवानी डोंगरावर चर खोदून प्रत्येक एक मीटर अंतरावर १८०० झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी चर खोदण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातून घनवनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. १२० चौरस मीटर अंतराचा व एक मीटर खोल अशी जागा तयार करून त्यात मियावाकी जपानी तंत्रज्ञानावर आधारित जंगलाचीही निर्मिती करण्यात येत आहे. खड्ड्यात पालापाचोळा, माती, भुसा अशा स्वरूपाचा थर देऊन तो भरण्यात आला आहे. त्यात दोन हजार शंभर झाडे लावण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...