आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेकीत उपनिरीक्षक सुनीता कोळपकर जखमी:अट्रावलमध्ये दंगल; दोन्ही गटातील 16 जण ताब्यात

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन गटातील वादातून तालुक्यातील अट्रावल येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यामुळे शनिवारी गावात दंगल उसळून दगडफेक झाली. त्यात यावल येथील महिला पोलिस उपनिरीक्षकासह दोन्ही गटातील १० जण जखमी झाले. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलाचे पथक घेऊन गावात दाखल झाले. पोलिसांनी १६ दंगलखोरांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सायंकाळी उशिराने ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. अट्रावल येथे शुक्रवारी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता. त्यात गाड्यावर बसण्यावरून दोन गटातील तरुणांमध्ये वाद झाला होता.

मात्र, किरकोळ वाद तेथेच मिटवण्यात आले. शनिवारी हेच तरुण डॉ. आंबेडकरनगरात एकमेकांसमोर येऊन भिडले. यात महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने दंगल उसळली. दोन्ही गटांकडून दगडफेक सुरू झाली. ही माहिती मिळताच फैजपूरचे एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर, उपनिरीक्षक एम. जे. शेख, यावलच्या उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, उपनिरीक्षक सुदाम काकडे, अविनाश दहिफळे पथकासह दाखल झाले. दरम्यान, गावात दगडफेक सुरू होती. या वेळी डोक्याला दगड लागून उपनिरीक्षक सुनीता कोळपकर व गावातील १० जण जखमी झाले. ही माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील हे पथकासह अट्रावलमध्ये दाखल झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवून जखमींना यावल रुग्णालयात हलवले. सर्च ऑपरेशन राबवून दोन्ही गटातील १६ संशयितांना ताब्यात घेतले.

दंगलीत अनेक जण जखमी झाल्याचे कळताच १०८ रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले. त्यातील डॉ. इरफान खान, रऊफ खान यांनी पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर व जखमींवर जागेवरच प्रथमोपचार केले. इतर जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. शिवदास चव्हाण व कर्मचाऱ्यांनी उपचार केले.

प्रशासनाकडून पंचधातूच्या मूर्तीची केली स्थापना या दंगलीत महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्यामुळे पोलिस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सायंकाळी तातडीने पंचधातूची मूर्ती मागवून त्याच जागेवर स्थापनादेखील केली. गावातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले.