आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिकेचा निर्णय:विभागातील 1600 जातीवाचक वस्त्यांची नावे हद्दपार, तृतीयपंथीयांना मानधन देण्याचा विचार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समाज कल्याण विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून आज अखेर 1659 जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची नावे बदलण्यात आले आहे. तसेच पुणे महापालिकेच्या धर्तीवर तृतीय पंथीयांना मानधन देण्याचा विचार करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय दक्षता व नियंत्रण समिती, तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या समिती यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते. यावेळी विशेष पोलिस महानिरिक्षक,डॉ.बी. जी. शेखर पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा सरकारी अभियोक्ता राजाराम बेंडकोळी ,समाजकल्याण विभागाचे उपायुक्त डॉ भगावान वीर,पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले , उपायुक्त रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे उपस्थित होते. दुरदृष्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासह सर्व यंत्रणाचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, विभागातील शहरी क्षेत्रातील 190 नावे बदलण्यात आली आहेत. तर ग्रामीण भागातील 1459 जातीवाचक नावे बदलण्यात आली आहेत. विभागातील शहरी भागात महानगरपालिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही नावे बदलण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी सर्व संबंधित यत्रणांना दिले. तृतीयपंथी कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले, या कल्याण मंडळाचा देखील आढावा आज रोजी घेण्यात आला.

तृतीयपंथी व्यक्तीच्या कल्याणासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करावी. तसेच पुणे महानगरपालिका प्रशासनाने रुपये 3 हजार मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धर्तीवर विभागातील महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून विचार करण्यात येईल, असेही गमे यानी यावेळी सांगितले.

विभागीय आयुक्त श्री गमे यांनी यावेळी विभागीय समितीच्या सदस्य शमिना पाटील (जळगाव) यांनी तृतीयपंथीयाना येणाऱ्या अडचणी व सामाजिक प्रश्नाबाबत उपस्थिताना माहिती करुन दिली.

नाशिक विभागात एकूण 603 तृतीयपंथीयांची संख्या असून त्यापैकी 363 तृतीयपंथीयांना कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती समाज कल्याण विभागात प्राप्त झाली आहे, त्याचप्रमाणे विभागात 129 जणांना ओळखपत्र व ओळखपत्र प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे उपायुक्त भगवान वीर यांनी दिली.

विभागीय दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंर्तगत घडलेल्या गुन्हयांच्या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक देखील श्री गमे यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी विभागाचा आढावा घेण्यात आला, यावेळी श्री गमे यांनी विभागातील सर्व जिल्ह्यातील प्रांतधिकारी यांच्या बैठका वेळेवर होत नसल्याचे बाब निदर्शनास आणुन देत, सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्हाच्या समितीत आढावा घेण्याचे सुचित केले. सदर अधिनियमांतर्गत गेल्या तीन महिन्यात च्या कालावधीत घडलेल्या गुन्हांचा तपशील जिल्हावार आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने अत्याचारग्रस्तांना देण्यात आलेले अर्थसहाय्य व त्यासंदर्भात करण्यात येत असलेली उपाययोजना याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी त्यानी सुचित केले. त्याचप्रमाणे प्रंलबित असलेल्या गृन्ह्यांचा तपास वेळेत पुर्ण करुन चार्चशीट दाखल करावे, याकामी कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची सर्व यत्रणांनी खबरदारी घेण्याचेही निर्देश गमे यांनी यावेळी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...