आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी. बी. स्टार स्कॅन:सीएनजी पाइपलाइनच्या कामांमुळे रस्ते खड्ड्यात; नागरिकांचे मार्गक्रमण खडतर, अपघातांत वाढ

जहीर शेख | नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध भागांत एमएनजीएल कंपनीकडून सीएनजी गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, पाइपलाइन टाकल्यानंतर खोदलेले रस्ते अस्ताव्यस्त स्वरूपात बुजवले जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणच्या रस्त्यांवर मातीचे ढिगारे तसेच पडले असल्याने रस्ता वाहतुकीसाठी खडतर झाला आहे. रस्ते बुजविताना फक्त खडी व मुरुमाचा वापर करण्यात येत असल्याने या रस्त्यांवरून वाहने घसरून अपघात हाेत आहेत. काही भागात तर नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते खोदून पाइपलाइन टाकण्याचे काम केले जात असल्याची बाब डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आली. विशेष म्हणजे, महाराष्ट्र गॅस लिमिटेड कंपनीकडून पाइपलाइन टाकण्याचे काम नियमानुसार होत नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रारी वारंवार येत आहे. खोदाई झालेल्या भागात अपघातांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित गॅस कंपनीला महापालिका आयुक्तांकडून नोटीस बजावून ही काहीच होत नसल्याने यावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत....

शहरात घरोघरी सीएनजी पोहाेचविण्यासाठी महाराष्ट्र गॅस लिमिटेड कंपनीकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु, नियमानुसार खोदाईचे कामे होत नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील शालिमार, अशोकारोड, शरणपूररोड, जेहान सर्कल परिसर, महात्मानगर परिसरातील रस्ते या कामासाठी खोदण्यात आले होते. या परिसरात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून गॅस पाइपलाइन टाकण्यात आले. खोदकाम करताना ठेकेदाराने लक्ष न दिल्याने अनेक सोसायटीमध्ये जाणाऱ्या पिण्याच्या पाइपलाइन, इलेक्ट्रिक केबल, तसेच पथदीपांच्या केबल तुटल्या आहे.

यामुळे अनेक सोसायट ीमध्ये जाणारा पाणीपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. केबल तुटल्याने अनेकांची विद्युत उपकरणे बंद पडली होती. खोदकाम पूर्ण झाले असतानाही गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यांवर खड्डे बुजविले नसल्याने रस्त्यावर मातीच माती पसरलेली आहे.

माती पसरल्याने रस्त्यावर धूळ उडून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागांमध्ये खोदकाम दिसून येत असल्याने या भागातील अनेक परिसरात बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यांचे डांबरीकरणासाठी स्थानिकांकडून वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कामांमुळे अपघातात वाढ झालेली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या भागात गॅस पाइपलाइनच्या कामामुळे खड्डे कायम
शालिमार, अशोकारोड, वडाळारोडसह एबीबी सर्कलपासून ते जेहान सर्कल रस्त्यावर गॅस पाइपलाइनमुळे प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामध्ये महात्मानगर पाण्याच्या टाकीपासून पुढे समर्थनगर, भोंसला मिलिटरी स्कूल, मॉडेल कॉलनी, जेहान सर्कल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, मॉडेल चाैक भागात तसेच महात्मानगर पाण्याच्या टाकीपासून सरळ खाली वसाहतीकडे जाणाऱ्या खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. अशोकस्तंभ, गोळे कॉलनी, शालिमार, शरणपूररोड, सातपूर पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूचा अंतर्गत रस्त्यावर खड्डे तसेच आहे. येवलेकर मळा, कॉलेजरोडच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर रामदास कॉलनी परिसरातही खड्डे कायम आहेत.

खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ
खोदाईचा खर्च वाचविण्यासाठी लांबलचक खोदाई करून काम केले जाते व ते काम विलंबाने होत असल्याने चांगल्या रस्त्यांची तोडफोड तर होत आहेच, त्याशिवाय खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ झाल्याचे समोर आले आहे. तसेच, खड्डे करताना भूमिगत वीजतारा तुटून वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहे, तर जलवाहिनीबाबतही अशाच तक्रारी आहेत.

खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट
शहरातील अनेक अपार्टमेंटमध्ये पाइपलाइनची कामे झाली. मात्र, ही कामे व्यवस्थित झालेली नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. काही इमारतीजवळ गॅसची पाइपलाइन टाकल्यानंतर ते बुजवण्याचे काम निकृष्ट झाले आहे. वाहने जाऊन आताच रस्त्याला खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी महावितरणाच्या भूमिगत केबल वर आल्या आहेत.

अटी-शर्तींकडे दुर्लक्ष
पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस घरोघरी पोहाेचविण्यासाठी एमएनजीएल कंपनीतर्फे शहरात दोनशे किलोमीटर रस्त्यांची खोदाई करून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मुख्य रस्ते खोदाईसाठी दोन, तर एमडीपी अर्थात प्लॅस्टिक पाइपलाइन टाकण्यासाठी ४१ ठेकेदारांना काम दिले आहे. पाइपलाइन खोदताना ५० ते १०० मीटर खोदून तेथील काम पूर्ण झाल्यानंतर पुढील खोदाई करावी, असे अटी व शर्तींमध्ये नमूद केले आहे. मात्र, एक काम पूर्ण होण्याआधीच दुसऱ्या कामांना सुरुवात केली जात आहे.

मातीच्या ढिगाऱ्यांमुळे अपघातांत वाढ गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले. पाइपलाइन टाकल्यानंतर खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्याने रस्त्यांवर मातीचे ढिगारे पडले आहेत. त्यामुळे अपघात घडत आहे.- पूजा चोपडा, नागरिक

सोसायट्यांच्या वायरींचे नुकसान
गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम करताना ठेकेदाराने लक्ष न दिल्याने अनेक सोसायटीमध्ये जाणाऱ्या पिण्याच्या पाइपलाइन, इलेक्ट्रिक केबल तुटल्या आहे.त्या ठिकाणी दुरुस्तीही करण्यात आलेली नाही. - अर्चना सोनवणे, नागरिक

धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पाइपलाइनसाठी रस्त्यांवर खड्डे केले. मात्र, आता सहा महिने उलटूनही बड्डे बुजविलेले नाहीत. रस्त्यावर माती पसरलेली आहे. माती पसरल्याने रस्त्यावर धूळ उडून नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.-- पूजा बेलोकर, नागरिक

बातम्या आणखी आहेत...