आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू:1 ते 17 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी, 10 शाळांचे पर्याय नोंदवता येणार

प्रतिनिधी | नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशाने शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ या वर्षासाठी शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अखेर आता पालकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

१ ते १७ मार्चपर्यंत पालकांना आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्जाची मुदत आहे. यंदा प्रवेशासाठी राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर होईल. सोडतीनंतर प्रत्यक्ष प्रवेशासाठी एक नियमित फेरी राबविली जाईल. या फेरीमध्ये संधी मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी टप्प्याटप्प्याने प्रतीक्षा यादीनुसार चार फेऱ्या राबविल्या जातील. प्रवेश अर्ज करताना पालकांना दहा शाळांची निवड करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शाळांची नोंदणी होऊन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली होती. यंदा शाळांच्या नोंदणी प्रक्रियेलाच विलंब झाला. १६ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहिली. त्यानंतर आता पालकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील ४०१ शाळांमध्ये यंदा २५ टक्के अंतर्गत राखीव असलेल्या ४ हजार ८५४ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जाणार आहे. मार्च अखेर सोडत जाहीर होण्याची शक्यता असून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया एप्रिल व मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

प्रवेशासाठी हे अनिवार्य

वंचित गटातील मुलांच्या प्रवेशाकरिता वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही. तर एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. प्रवेशाकरिता १० शाळांची निवड करावी. अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त ५ वेळाच निश्चित करता येईल, याची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवास स्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे. अर्ज भरताना पालकांची अचूक माहिती भरावी.

प्रवेशासाठी हे कागदपत्रे आवश्यक

- निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस, वीज देयक, टेलिफोन, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेच पासबूक यापैकी एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. स्वत:च्या मालकीचे घर नसल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असलेला भाडेकरार ग्राह्य धरण्यात येईल. जन्मदाखला, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड यांसह इतर आवश्यक कागदपत्रे अनिवार्य असतील. https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अशी झाली नोंदणी

४०१- आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या शाळांची संख्या

४८५४- प्रवेशासाठी उपलब्ध जागा

बातम्या आणखी आहेत...