आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची लूट:रिक्षा मीटर सुरू करण्यासाठी आरटीओचे मीटर

जहीर शेख | नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमानुसार रिक्षा या मीटरप्रमाणेच रस्त्यावर चालवणे अपेक्षित असताना त्यास सर्रासपणे फाटा दिला जात असून मीटर बसवून पासिंगसाठी आरटीआे कार्यालयात शासकीय शुल्क पाचशे तर अडीच हजारांची दलाली द्यावी लागत असल्याची सबब रिक्षाचालक सांगत आहे. मीटरप्रमाणे आकारणी झाल्यास सर्वसामान्यांची अतिरिक्त शुल्क आकारणीच्या माध्यमातून हाेणारी लूट थांबू शकते, मात्र आरटीआे, शहर पाेलिसांचे लक्ष त्यापेक्षा दंड वसुलीकडेच अधिक असल्यामुळे सामान्य प्रवाशांची लूट थांबलेली नाही. परिणामी, रिक्षाचालकांची मनमानी वाढली असून ‘मागू ते भाडे’ अशी परिस्थिती शहरात आहे. तर रिक्षात मीटर बसविण्यासाठी दलालांकडून ५०० एेवजी २५०० रुपये घेतले जात आहेे. यावर डीबी स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत...

बेशिस्त रिक्षाचालकांमुळे शहरात वाहतूककोंडी गंभीर बनली आहे. एखाद्या प्रवाशाला मीटरनुसार प्रवास करायचा असेल, तर रिक्षा सापडणे मुश्कीलच आहे. तसेच, रिक्षाचालक कितीही काहीही झालं तरी मीटर टाकून वाहतूक करणार नसल्याचेच उत्तर प्रवाशांना देतात. शहरात अनेक ठिकाणी पॉइंट टू पॉइंट शेअर पद्धतीने किंवा मनमानी पद्धतीनेच वाहतूक केली जात आहे. नाशिकरोड ते शालिमार, सीबीएस ते सिडको, आडगाव, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, स्टेट बँक ते पाथर्डी, आडगाव ते रविवार कारंजा असे अनेक स्टॉप आहेत.

प्रत्येकाचे भाडे या स्टॉपवर प्रति व्यक्तीनुसार ठरलेले आहे. काही ठिकाणी ही चांगली गोष्ट असली तरी ज्यांना थेट रिक्षा हवी आहे, त्यांची अनेकवेळा पंचाईत होत असल्याचे चित्र आहे.पॉइंट टू पॉइंट सोडून अन्य ठिकाणी जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारले जात असल्याचे चित्र डीबी स्टारच्या पाहणीत दिसून आले.तसेच, मीटरप्रमाणे चालण्याची मागणी केल्यानंतर रिक्षाचालक नकार देऊन ‘हमरीतुमरी’वर येत येतात. रात्री रिटर्न प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगत रिक्षाचालक स्वतःच दर ठरवतात.

लुटीमुळे मात्र प्रामाणिक रिक्षाचालकांना त्रास
बाहेरगावहून नाशकात पर्यटन किंवा कामानिमित्त येणाऱ्या नवीन प्रवाशांना फारशी माहिती नसते. त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा काही रिक्षाचालक घेऊन त्यांची आर्थिक लूट करतात. त्यामुळे प्रामाणिक सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांविषयी देखील गैरसमज निर्माण होत आहे. अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून आहे.

रिक्षांमध्ये मीटर आहे, पण ते कायमचे बंदच
नियमानुसार मीटरप्रमाणे भाडे आकारणी करणे बंधनकारक असते. मात्र, अनेक रिक्षांमध्ये मीटर केवळ नावालाच बसवलेले असते. प्रत्यक्षात बंद असते किंवा त्याप्रमाणे भाडे आकारणी केली जात नसल्याचे डीबी स्टारच्या पाहणीत समोर आले. यासंदर्भात आरटीओकडून कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलले जात नसल्याचे चित्र आहे.

रिक्षा भाड्यात वाढ पण मीटर सक्तीकडे दुर्लक्ष
आरटीओमध्ये झालेल्या बैठकीत वाहनांच्या भाडेवाढीचा ठराव करण्यात आला. खटुआ समितीच्या शिफारशींच्या आधारे महागाई निर्देशांक व वाढलेले इंधन दर याचा विचार करून रिक्षा भाडेवाढ करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले होते. हे भाडेदर १० ऑक्टाेबरपासून लागू झाले आहे.मात्र,रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे रिक्षा चालवण्याची सक्ती करण्यात आलेली नाही.भाडेवाढ झाल्याचे सागून ग्राहकांकडून जादा पैसे घेतले जात आहे.पण मीटर बंदच असल्याचे चित्र आहे.

रिक्षाचालकांविषयी दाखल तक्रारींकडेही दुर्लक्ष
रिक्षाचालकांविषयी कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास प्रवाशाने आरटीओ कार्यालयात लेखी स्वरूपात निवेदन द्यावे. त्यानंतर संबंधित रिक्षाचालक व प्रवाशाला बोलावून घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. ही बाब चांगली असली तरी नेमक्या किती तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन केले जाते? हा प्रश्न कायम आहे.

प्रवाशांकडून रात्री अधिकचे पैसे घेत लूट
खासगी वाहनांचा वापर करणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे रिक्षा व सिटी बसचाच नागरिकांना आधार असतो. बस वेळेवर न आल्याने किंवा घाईत रिक्षालाच प्राधान्य द्यावे लागते. अनेकदा रिक्षाचालक मुख्य रस्त्यापासून आत येण्यास टाळाटाळ करतात. त्यासाठी ‘एक्सट्रा चार्ज’ मागतात. रात्रीच्या वेळी तर १० पट पैसे उकळण्यासही कमी करीत नाहीत.

भाडे आकारणीवरून अनेकदा वादावादी
बसस्थानक, रेल्वे स्थानकावर दिवसा आणि रात्री येणाऱ्या प्रवाशांची अनेकदा रिक्षाचालकांकडून आर्थिक लूट केली जाते. रात्रीच्यावेळी जादा भाडे आकारणीसाठी सुरुवातीला भाडे नाकारण्याचेही प्रकार घडतात. अशा रिक्षाचालकांची थेट आरटीओकडे तक्रार करता येते. मात्र, बहुतांश नागरिकांना याबाबत माहितीच नसते. अनेकदा रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये वादविवाददेखील हाेतात.

नाशिकरोड, द्वारका पट्ट्यावर अव्वाच्या सव्वा भाडे
शहरात शालिमार ते नाशिकरोड या टप्प्यात एका मिनिटाला शंभरहून अधिक रिक्षा धावतात. मुख्य शहरात येण्यासाठी हा एकमेव मार्ग नाशिकरोड स्टेशनला जोडलाय. त्यामुळे शहरात येणाऱ्या या मार्गावर पर्यटक, यात्रेकरूंकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. रिक्षाला लागलेले मीटर केवळ नावापुरते असते. शिवाय नाशिकमध्ये दाखल झालेले निम्मे प्रवासी मध्यवर्ती असलेल्या द्वारका थांब्यावर उतरतात. मात्र येथून देखील जादा पैसे घेतले जाते. तेथून पेट्राेलचे भाव वाढल्याच्या नावाखाली ३० ते ४० रुपये पूर्वीपेक्षा जादा घेतले जाते.

मीटर बसविण्यासाठी दलालांकडून २५०० रुपये
रिक्षांना नवीन मीटर बसविण्यासाठी ५०० रुपये फी आहे, मात्र दलाल रिक्षा चालकांकडून २५०० रुपये घेतात. शिलकी तत्त्वावर शहारात बऱ्याच रिक्षा आहेत. त्यांचे मालकही जास्त पैसे लागतात म्हणून यासाठी उत्सुक नसतात. तसेच निर्धारित वेळेत मीटर देखील दिले जात असल्याची स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...