आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना नाशिकमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व उपचारिकाच नसल्याने येथे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मातेलाच आपल्या मुलीची प्रसूती करावी लागली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्य संचालकांनी तत्काळ चौकशी करावी
या घटनेवर ट्विट करत रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टर नसल्याने स्वतःच्या आईनेच प्रसूती केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा भोंगळ कारभार समोर आला आहे. आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने आशा वर्कर आणि आईलाच मुलीची डिलिव्हरी करावी लागली. ही संपूर्ण बाब गंभीर असून या प्रकरणात आरोग्य संचालकांनी तत्काळ चौकशी करावी.
चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन
तसेच, चौकशी पूर्ण होवून दोषींना शिक्षा होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश महिला आयोगाने आरोग्य संचालकांना दिले आहेत, अशी माहितीही रुपाली चाकणकर यांनी दिली.
आरोग्य व्यवस्था बिघडलेली
नाशिकमधील घटनेसोबतच राज्यातील अशाच घटनांवरही रुपाली चाकणकर यांनी बोट ठेवले आहे. रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, नागपूरमधील अंबाझरी तालुक्यामध्ये एका अल्पवयीन गर्भवतीने युटुबवर बघून स्वतःची डिलिवरी केली आहे. त्यात तिच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात खड्ड्यात गेलेल्या रस्त्यामुळे गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना राज्यातील बिघडलेली कायदा आणि आरोग्य व्यवस्था अधोरेखित करत आहेत. त्यामुळे महिला आयोगाने या सर्व प्रकरणांची दखल घेऊन संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत त्यांचे निलंबन करावे, असे आदेश दिले आहेत.
नाशिकमध्ये नेमके काय घडले?
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्डेच्या वाडीतील गरोदर महिलेला रविवारी (दि.५) प्रसूती वेदना होऊ लागल्याने सोनाबाई लचके यांनी आशा कार्यकर्ती शीला देहाडे यांच्याशी संपर्क साधत खासगी वाहनातून अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मुलीला आणले. मात्र, तेथे आरोग्य केंद्र बंद असल्याचे आढळले. धावपळीनंतर वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याने रुग्णालय उघडले. मात्र, प्रसूती करण्यासाठी डॉक्टर व परिचारिका उपस्थित नसल्याने काळजी वाढली. गरोदर महिलेची आई सोनाबाई लचके यांनी स्वत:च आशा कार्यकर्तीच्या मदतीने मोठी जोखीम उचलून मुलीची प्रसूती केली. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.