आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Russia Ukraine Waar | Marathi News | Maharashtra Student In Ukraine | Marathi News | The Hostel Said, You See The Drinking Water; Aditi's Plight In Ukraine

रशिया Vs युक्रेन महायुद्ध:वसतिगृह म्हणाले, पिण्याच्या पाण्याचे तुम्हीच बघा; युक्रेनमध्ये अडकलेल्या अदितीची व्यथा

सचिन वाघ | नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिला दिवशी हाेस्टेल, हाॅटेल आणि माॅलमध्ये पाणी उपलब्ध असल्याने गैरसोय झाली नाही. आज (शुक्रवार, २५ फेब्रुवारी) मात्र मार्केटमध्ये पाणीच शिल्लक राहिले नाही. तसेच वसतिगृहातील पिण्याचे पाणीही संपत आल्याने तहानदेखील अर्धी भागवावी लागत आहे. वसतिगृहाने तुमच्या पाण्याची सोय तुम्हीच करून घ्या, असे सांगितले. त्यामुळे अन्नासह आता पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे अदिती देशमुख हिने दैनिक दिव्य मराठीच्या प्रतिनिधीसोबत थेट युक्रेनमधील खर्किव्ह या शहरातील वसतिगृह क्रमांक ५ मधून संपर्क साधला.

नाशिकरोडच्या बांधकाम व्यावसायिक सचिन देशमुख यांची पुतणी अदिती देशमुख ही एमबीबीएसच्या प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी ती भारतातून महिनाभरापूर्वीच युक्रेनमध्ये गेली. युद्धाचे वारे वाहत असले तरी ते होईल याबाबत काहीच कल्पना नव्हती. प्रत्यक्षात युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमधील शहरातील रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. अदिती म्हणाली की, आम्ही हाेस्टेल क्रमांक ५ मध्ये राहत असून कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी हाेस्टेलच्या बेसमेंटमध्ये आम्हाला थांबण्यास सांगितले. परंतु दिवस आणि रात्री बेसमेंटमध्ये बसून आहे. बाहेरील सर्व मॉल्स बंद असल्याने जवळ असलेल्या अन्नावर दिवस काढत आहोत. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने कमीत कमी प्यावे लागत आहे.

कतार एअरलाइन्सने ३ दिवस आधीचे तिकीट दिल्याने भारतात पोहोचलो : सोहेब कहाकर
युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात येण्यासाठी २७ फेब्रुवारीचे विमानाचे तिकीट काढले होते, मात्र कतार एअरलाइन्सने २७ ऐवजी २४ तारखेचे तिकीट बदलून दिल्याने मी आज भारतात सुखरूप घरी पोहोचू शकलो. २४ रोजी युक्रेनहून विमानात बसल्यावर त्याच दिवशी सायंकाळी दिल्ली विमानतळावर उतरलो. रात्री दिल्लीहून १ वाजता सचखंड एक्स्प्रेसने पाचोऱ्याकडे निघालो. शुक्रवारी दुपारी ३ वाजता पाचोरा रेल्वेस्थानकावर उतरल्यावर वडील डॉ. रसिद कहाकर यांनी भोकरी येथे घरी नेले. मी सुखरूप घरी आल्याने आई व वहिनीने गरिबांना धान्य दान केल्याचे सोहेब कहाकर या विद्यार्थ्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

कीव्ह येथील महाविद्यालयात तो दुसऱ्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. सोहेब कहाकर म्हणाला, रशियाने पहाटे ५ वाजता कीव्ह शहरावर बॉम्बहल्ला केल्याने सर्व रहिवासी इमारती हादरल्या. त्या धक्क्याने मला जाग आली. कीव्ह शहरापासून ५० किमी अंतरावर मी राहत असलेल्या इमारतीतही हादरा जाणवला. त्यामुळे माझ्यासह सर्व विद्यार्थी चौकशी करू लागले. प्रा. हरदिपसिंग यांनी आम्हाला या वेळी धीर दिल्याचेही त्यांनी सांगितले.

स्थिती निवळल्यानंतर पुन्हा जाणार
१५ दिवसांपूर्वी जर्मनीसह अन्य देशांनी युक्रेनमधील आपल्या नागरिकांना सुरक्षित नेण्याची व्यवस्था केली. भारताने मात्र विलंब केला. युक्रेनमध्ये २० हजार भारतीय विद्यार्थी व नोकरदारांचे वास्तव्य असून अनेक जण युक्रेनमध्ये अडकले आहेत. युद्धाची परिस्थिती निवळल्यानंतर तो परत शिक्षणासाठी युक्रेनला जाणार आहे. चार दिवसांपूर्वी अचानक आमच्या महाविद्यालयापासून ५० किमी अंतरावर रशियाने बॉम्बहल्ला केल्याने आपण मायदेशी परत जाणार की नाही यासह अनेक प्रश्न मनात घोंगावू लागले.

भारतीय दूतावासाची अद्याप मदत नाही
युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाची अद्यापही भारतीयांना मदत होत नाही. तसेच बाहेर काय घडामोडी घडत आहे याबाबत काही समजत नाही. त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळेल अशी प्रतीक्षा करीत असल्याचे अदितीने सांगितले.

ऑफलाइन क्लास सुरू असल्याने आणि युद्धाची छाया नसल्याने आम्ही कोणीही परतीचे तिकीट काढले नाही. अशातच बुधवारी येथे बाॅम्बस्फोट झाला. आणि गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत सायरन वाजत होते. आम्हाला लाइट बंद करायला सांगून बंकरमध्ये जाण्यास सांगण्यात आले. परंतु बंकरमध्ये गेलो आणि इमारत पडली तर आपण बंकरमध्येच अडकून राहू, या भीतीने अंधारात आणि गारठलेल्या वातावरणातही आम्ही वसतिगृहातच राहिलो. रशियन फौजा टर्नोपिल विमानतळ तसेच बिला वेअर हाऊसेसवर हल्ला करणार, अशा बातम्या येत होत्या. परंतु युक्रेनने हल्ला परतवून लावला, नागपूरच्या वैष्णवी वानखेडे हिने सांगितले.

युद्धग्रस्त युक्रेनच्या पश्चिम सीमेवरील देशांच्या मदतीने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्याचे भारतीय दूतावासाचे प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम सीमेवरील पोलंडने आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत. काही भारतीय तिथे पोहोचलेही आहेत. टर्नोपिल येथून ट्रेनने लव्हीव येथे जायचे. तेथून टॅक्सी वा बसने पोलंडमध्ये जायचे. पोलंड सीमेच्या २० ते २५ किमी आधी उतरवले जाते. तिथे दोन चेक पॉइंट आहेत. तेथून पायपीट करून पोलंडमध्ये जावे लागते. आमचा निर्णय झाला की आम्हीही निघू.

आमचे ऑफलाइन वर्ग सुरू होते : रशियाने युक्रेनच्या पूर्व भागात हल्ला केला. त्यावेळी आमचे ऑफलाइन वर्ग सुरू होते. टर्नोपिल युक्रेनच्या पश्चिम भागात असून या भागात युद्धाचे सावट नाही, असे आम्हाला सांगितल्याने आणि आमचे ऑफलाइन वर्ग सुरू असल्याने आम्ही निर्धास्त होतो. पण, बुधवारी आकाशात धुराचे लोट दिसल्याने मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर मायदेशात परत जाऊ इच्छिणारे भारतीय जाऊ शकतात अथवा इथेही राहू शकतात. त्यांच्यासाठी ऑनलाइन क्लासेस घेऊ, असे सांगितले. ऑनलाइनमध्ये वैद्यकीय विषय समजणार नाही म्हणून ऑफलाइन क्लास सुरू ठेवला...

{ शब्दांकन : अतुल पेठकर, नागपूर

बातम्या आणखी आहेत...