आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन वर्षाचे औचित्य साधत शहरातील पंचवटी परिसरातून सदभावना रॅली सोमवार (02 जानेवारी) दुपारी काढण्यात आली. तसेच विश्वशांती आणि विश्व बंधुत्वाचे आवाहन करण्यात आले. या रॅलीमध्ये मानव धर्म प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकमेकांप्रती मनात सदभावना ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सदगुरूदेव श्री सतपालजी महाराज यांच्या मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने नववर्ष स्वागत आणि श्रेयांशजी महाराज यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून सदभावना रॅलीचे आयोजन केले होते. तपोवनातील कपिला संगमासमोरील सर्व धर्म मंदीर आश्रम येथून सकाळी पावणेनऊच्या सुमारास सदभावना रॅलीला सुरूवात झाली.
यामध्ये शेकडो मानवधर्म प्रेमी सहभागी झाले. विश्व मे शांती कैसे होगी केवल आत्मज्ञानसे, आत्मज्ञान कहां मिलेगा सदगुरूके दरबारमे, फैलेगा जब आत्मज्ञान देश बनेगा उच्च महान, जागे है जगायेंगे आत्मज्ञान फैलायेंगे, हिंदु - मुस्लिम - सीख - ईसाई आपसमें सब भाई भाई यांसारख्या घोषणा देत मानवधर्म प्रेमींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. लाल रंगातील साड्या परिधान करून महिला आणि सफेद कपडे परिधान करून पुरूष बांधव मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले. रॅलीत छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाईंच्या रुपात घोड्यावर स्वार युवक - युवतींनी या निमित्ताने देशातील शौर्याचा जागर केला.
श्री हंस कल्याण धाम आश्रमाच्या प्रबंधक साध्वी हिराजी, साध्वी पंकजाजी, साध्वी तिरथजी, महात्मा अनासक्तानंदजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मानवधर्म प्रेमींनी विश्वशांती आणि विश्वबंधुत्वाचा नारा दिला. महापुरूषांनी दिलेल्या संदेशाचे फलक हाती घेऊन सहभागी झालेले बांधव सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. रॅली शिस्तबध्दरित्या चालत राहावी याकरीता मानव सेवा दलाच्या जवानांनी योगदान दिले.
लक्ष्मी नारायण मंदीर, डेंटल कॉलेज, काट्या मारूती मंदीर, काळाराम मंदीर, कपालेश्वर मंदीर, पंचवटी कारंजा, निमाणी मार्गे ही सदभावना रॅली पुन्हा तपोवनातील सर्व धर्म मंदीरात पोहोचली. त्यानंतर सत्संग सोहळा झाला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.