आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकमंथन:लेखक - प्रकाशक साहित्य संमेलन साताऱ्यात, मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती, वसंत खैरनार यांना जीवनगौरव

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे यंदाचे लेखक- प्रकाशक साहित्य संमेलन साताऱ्यात होत आहे. शनिवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाच वाजता संमेलनाचे उदघाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळी वसंत खैरनार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाशक संघाचे पदाधिकारी विलास पोतदार यांनी दिली. या संमेलनाला मकरंद अनासपुरे उपस्थित राहणार आहेत. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय: काल, आज, उद्या हा प्रमुख विषय यंदाच्या संमेलनात चर्चेच्या मुख्यस्थानी असणार आहे.

सर्व प्रकाशक येणार

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, ही मराठी भाषा आणि वाचन संस्कृती टिकवणे व तिचे संवर्धन करणे यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे फार महत्वाची भूमिका बजावत असतात. या ग्रंथालयांकडून केली जाणारी पुस्तक खरेदी ही प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते यांच्यासाठीही अतिशय महत्वाची बाब असते. एकूणच ही ग्रंथालय चळवळ हा आपल्या सर्वांचाच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या संमेलनाचे आयोजन करण्यात येते. दोन दिवसीय या संमेलनास राज्यातील सर्व प्रकाशक हजेरी लावणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी ग्रंथालय संचालिका, शालिनी इंगवले व साहाय्यक ग्रंथालय संचालक माननीय दत्तात्रय क्षीरसागर यांच्यासह प्रकाशक संघाचे प्रा. यशवंत पाटणे (सातारा), रवींद्र बेडकीहाळ (फलटण), दत्तात्रेय पाष्टे (पुणे), सदाशिव बेडगे (सोलापूर), विलास पोतदार (नाशिक), डाॅ. सुजाता पवार (सातारा) आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यावर होणार साधक-बाधक चर्चा

- या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या ज्ञानमंदिरांचा यापुढील प्रवास कसा व्हायला हवा याचा विचार.

- याबाबतचा इतिहास आणि वर्तमान स्थिती.

- साहित्यावर विविध अंगाने विचारमंथन.

- शासनाचा भविष्यकालिन दृष्टिकोन.

- लेखक-प्रकाशक यांच्या अडचणी.

- साहित्य आणि प्रकाशन यावर साधक-बाधक चर्चा.

- मकरंद अनासपुरे यांच्याशी धमाल गप्पा.

रविवार (दि. १९) दुपारी २.३० वाजता चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी दिलखुलास होणार आहेत. विनोद कुलकर्णी हे अनासपुरे यांच्याशी संवाद साधणार आहेत.

लेखिका-प्रकाशिकांचा खास कार्यक्रम

साहित्य विश्वात लेखिका आणि प्रकाशिका म्हणून महिलांनी फार मोठे आणि महत्वाचे योगदान दिले आहे. अशा कर्तबगार महिलांची साहित्य क्षेत्रातील यशोगाथा जाणून घेण्यासाठी शनिवारी दुपारी अडीच वाजता त्यांच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. त्यात शब्दालयच्या सुमती लांडे, उन्मेष प्रकाशनाच्या मेधा राजहंस, संस्कृतीच्या सुनीतराजे पवार, निहाराच्या स्नेहसुधा कुलकर्णी, लेखिका संध्या चौघुले, अनघा कारखानीस, प्राची गडकरी सहभागी होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...