आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनाचा वाद पेटला:पवारांना मोठे करणारा मी कोण? ठालेंची काय दखल घ्यायची - संजय नहार, टकले घेणार ठालेंची भेट

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठालेंनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे : नहार

शरद पवार हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यांना मोठे करणारा मी किंवा ठाले तरी कोण? त्यामुळे कौतिकराव ठाले पाटील यांच्या वक्तव्यावर वा लिखाणावर काय बोलायचे? अशी खिल्लीवजा उद्विग्नता संजय नहार यांनी व्यक्त केली. नाशिक संमेलनासाठीच्या निधी व इतर बाबींबद्दल ठालेंचे काही गैरसमज झाले आहेत ते भेट घेऊन दूर करू, असे हेमंत टकले यांनी म्हटले आहे.

अ. भा. साहित्य महामंडळाच्या ‘अक्षरयात्रा’ या नियतकालिकात ठाले यांनी दिल्लीत संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेणारे संजय नहार यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. पवारांना संमेलनाचे स्वागताध्यक्ष करून त्यांना मोठे करायचे होते. तसे ते विविध व्यक्तींची व राजकीय नेत्यांची नावे घेऊन दरवेळी मला फोनवर सांगत होते. याचा अर्थ इतके दिवस पवार त्यांच्या दृष्टीने लहानच होते. दिल्लीतच संमेलन व्हावे यासाठी बातम्याही पसरवल्या. मला सौम्य धमक्या देण्यात आल्या, असेही ठाले पाटील यांनी म्हटले आहे.

गैरसमज दूर करू
नाशिकच्या संमेलनाचे आयोजक, लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले म्हणाले की, गैरसमजातून ठाले पाटील यांनी निधी संकलन, अंदाजपत्रकाविषयी आरोप केले आहेत. त्यांना प्रत्यक्ष भेटून ते दूर करू.

वेगळाच अर्थ काढला
दरम्यान, ठाले पाटील यांच्याशी शुक्रवारी (२५ जून) संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला जे सांगायचे होते. ते अक्षरयात्राच्या लेखात आहे. मात्र, पवारांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाला माझा विरोध आहे, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. ते चुकीचे आहे. एका दैनिकाने सहस्त्रचंद्रदर्शनाविषयी कशा बातम्या रंगवल्या होत्या, असा संदर्भ मी दिला. त्याचा वेगळाच अर्थ काढण्यात आला.

ठालेंनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे : नहार
सरहद संघटनेचे अध्यक्ष नहार म्हणाले की, शरद पवारांना मोठे करणारा मी कोण? पवार म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहेतच. पण संमेलनात त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा मुद्दाच नव्हता. संमेलनाचे पाहुणे, वक्ते, अध्यक्ष वगैरे सगळे तुम्हीच ठरवा, असे बोलणे झाले होते. त्यामुळे ठाले पाटलांचे आरोप धादांत खोटे आहेत. दिल्लीतील संमेलनाचे पवार स्वागताध्यक्ष असते तर मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिबिंब उमटले असते. पण ठालेंना ते कळलेच नाही. मी त्यांच्याशी धमकीवजा काहीच बोललो नाही.

बातम्या आणखी आहेत...