आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांची फसवणूक:हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्यांची व्यापाऱ्यांकडून विक्री; नाशिक बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक, केरळ राज्यातून आलेला आंबा चक्क देवगड, काेकण हापूस या नावाने आंबा व्यावसायिक विक्री करत असल्याचा प्रकार ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत उघडकीस आला आहे. बाजार समितीमधील व्यापारी याप्रकारे ग्राहकांची फसवणूक करत आहेत. हापूस आंब्याच्या किमती इतर आंब्यांपेक्षा जास्त असतात. याचाच व्यापारी फायदा घेत आहे. पुणे येथे पणन विभागाने व्यापाऱ्यांवर कारवाई केली, मात्र नाशिकमध्ये बाजार समितीकडून साधी चौकशीही केली नसल्याने समिती प्रशासन आणि अन्न व औषध विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

अक्षय्य तृतीयेनंतर बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक वाढली आहे. पेठरोडवरील फळ मार्केटमध्ये आणि शहरातील विविध व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी येत आहे.

असा ओळखा अस्सल हापूस
फळ मार्केटमध्ये आंबा व्यावसायिक रत्नागिरी, देवगड हापूसच्या खोक्यांमध्ये केरळ, कर्नाटकातील आंबे ठेवतात. हाच फरक ग्राहकांना कळत नाही. अस्सल हापूस आंब्याचा सुगंध दूरवरून येताे. या आंब्याची पातळ साल लगेचच लक्षात येते. पिवळा आणि केशरी यांच्यामधील रंगाच्या विविध छटांचे मिश्रण या आंब्यात दिसते. हा आंबा खालच्या टोकापर्यंत गोलाकार आणि वजनदार असतो. दक्षिणेतील आंब्याचे टोक निमुळते असते. हापूस आंब्याची फोड इतर आंब्याच्या फोडीपेक्षा अधिक रसदार असते. हापूस आंबा गोड आणि चवदार लागतो. इतर राज्यांतील आंबा बाहेरून हिरवा, आतून पिवळा, अल्प रसाळ व त्याचा आकार उभट असतो. कोकण हापूस आंब्याची डझनावर विक्री केली जाते. फळ मार्केट आणि इतर ठिकाणी व्यावसायिक कर्नाटक हापूस आंब्याची विक्री किलोवर विक्री करत ग्राहकांची फसवणूक करतात.

दक्षता घेण्याचे काम बाजार समितीचे
बाजारात आवक होत असलेला आंबा ज्या राज्यातून येईल त्याच नावाने विक्री होईल याबाबतची दक्षता घेणे, फळ मार्केटमधील गाळेधारक, अडत्या, व्यापारी आणि बिगरगाळाधारक अडत्या यांना सूचना देणे. कोणी फसवणूक करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करणे या कामांची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आहे.

तपासणी करणार
फळ मार्केटमध्ये अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याची एकही तक्रार नाही. मात्र अचानक तपासणी करून फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- फय्याज मुलानी, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती

बातम्या आणखी आहेत...