आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्गाचा ग्राउंड झीरो रिपोर्ट:ताशी 150 किमीचा वेग अन् सुरक्षेचा मेळ, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभियंत्यांची कमाल यामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

11 दिवसांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक

शून्यातून प्रारंभ करीत “ग्रीनफील्ड’ पद्धतीने उभारला गेलेला, समस्तर रचना करीत २.५% पेक्षाही कमी ग्रेडीएंट असणारा, ताशी १५० किलोमीटर भरधाव वेगासाठी डिझाइन केलेला देशातील पहिला एक्स्प्रेस वे अर्थात “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ राज्याच्या विकासात ऐतिहासिक मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळेच या महामार्गाची आजची स्थिती, त्याचे वेगळेपण आणि सुरू असलेल्या कामाची व्याप्ती याचा “दिव्य मराठी’ टीमने ५२७ किलोमीटरचा प्रवास करत थेट ग्राउंडवरून मांडलेला वृत्तांत...

शिर्डी - मनमाड रस्त्यावरून ‘दिव्य मराठी’ चमूच्या वाहनाने प्रवासास प्रारंभ केला तेव्हा तेथील खड्ड्यांमधून बसणाऱ्या भयंकर गचक्यांमुळे पोटातील पाणी उचंबळून कोणत्याही क्षणी बाहेर येईल अशी अवस्था होती. पण, शिर्डीपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील कोकमठाण गावानजीक येताच एका अद्भुत, रोमांचकारी प्रवासाला सुरुवात झाली ती समृद्धी महामार्गामुळे. रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली अजस्त्र यंत्रसामग्री, लाल-पिवळी हेल्मेट घालून कामात गुंतलेले हजारो मजुरांची लगबग आणि स्पीडोमीटरचा काटा १५० आकड्याला स्पर्श करीत असतानाही पोटातील पाण्याची शांतता अनुभवता येणारा तो स्थीर प्रवास... अर्थात, महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील प्रवासाची ही अनुभूती लवकरच सर्वांना घेता येणार आहे.

“एक्स्प्रेस वे दोन प्रकारचे असतात. ब्राउन फिल्ड म्हणजे जिथे अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे विस्तारीकरण करून एक्स्प्रेस - वे बांधला जातो आणि ग्रीन फिल्ड म्हणजे जिथे काही नव्हतंच तिथे पूर्णपणे नव्याने एक्स्प्रेस वे उभारला जातो’, सोबतचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अभियंते माहिती देत होते. शून्यातून उभारलेल्या या महामार्गाचे साक्षीदार असणारे हे अभियंते या “समृद्धी’च्या कामातील आव्हानात्मक टप्प्यांची माहिती देताना शहरात होते. विक्रमी वेळातील भूसंपादन, पर्यावरण आणि वन खात्यांच्या परवानग्या आणि तेवढ्याच विक्रमी वेेळेत “प्री-कास्ट टेक्नॉलॉजी’ वापरून ताशी १५० किमी वेगासाठी डिझाइन केलेल्या या देशातील पहिल्या एक्स्प्रेस वेच्या जडणघडणीची माहिती ते देत होते. नागपूर ते शिर्डी या “समृद्धी’च्या पहिल्या फेजमधील शिर्डी ते वैजापूर या मार्गावरून जाताना गाडीच्या वेगाचा थरार फक्त मनातच अनुभवत होतो. आतापर्यंत देशातील अन्य एक्स्प्रेस वे जास्तीत जास्त ताशी १२० किलोमीटर वेगाच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आलेले आहेत. मात्र, प्रथमच ताशी १५० किमी दृष्टीने डिझाइन केलेल्या या महामार्गावरील प्रवास तेवढाच “समृद्ध’ करणारा ठरत होता. नगर जिल्ह्यातील २९ किमी टप्पा ११, औरंगाबाद जिल्ह्यातील १११ किमीचे १० आणि ९ टप्पे, जालन्यातील ४२ किमीचा ८ वा टप्पा, बुलडाणा ८७ किमीचा टप्पा ७ आणि ६, वाशीम जिल्ह्यातून जाणारा १०६ किमी टप्पा चार आणि पाच, अमरावतीतील ७३ किमीचा टप्पा ३, वर्ध्याचा ५८ किमीचा टप्पा दोन पार करत नागपूरच्या शिवमडका जंक्शनवरील ‘झीरो पॉइंट’पर्यंत अवघ्या काही तासांत पोहोचण्याचा थरारक अनुभव यानिमित्ताने घेता आला.

५२७ किमीच्या पहिल्या फेजवरील प्रवासात ठिकठिकाणी दिसतात, दिमाखात उभे राहिलेले लहानमोठे पूल, नदी-नाल्यांना ओलांडणारे, रेल्वे पार करणारे ब्रिज, कुठे भेदत जाणाऱ्या राज्यमार्गांना वाट करून देणारे तर कुठे भोवतालच्या गावकऱ्यांच्या प्रवासासाठी करण्यात आलेले भुयारी मार्ग, नजीकच्या शहरांना जोडणारे इंटरचेंज सर्कल, काही ठिकाणी अजस्त्र पहाडी चिरून तर काही ठिकाणी दऱ्यांमधून स्तंभ रोवून वर उचलत समतलता साधलेला रस्ता. नागपूर ते मुंबई रस्ता प्रवासाचे एरवी किमान १४ ते १६ तासांचे अंतर अवघ्या ८ तासांवर आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे वेगात सहसा बदल न करावा लागणारी “समस्तर’ रचना. महामार्गावरील चढ-उतारांची स्थिती २.५% पेक्षा कमी असल्याने वेगवान प्रवासही सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने याची बांधणी करण्यात आली आहे. त्यासाठी सहा - सहा किलोमीटरपर्यंत टेकड्यांना छेद देताना मनात उभा राहतो तो पर्यावरणाचा प्रश्न. त्यावर उत्तर म्हणून वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारासाठी बांधण्यात आलेले तब्बल ८० पथमार्ग पर्यावरण व भौतिक विकास दोन्हीचा मेळ घालत विकासाची समृद्धी साधताना दिसतात.

पूर्ण झालेली बांधकामे
पूल : १६०
वाहनांसाठी भुयारी मार्ग : १७४
पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग :१९०
कालव्यांवरील मार्ग : १४
वन्य जीवांसाठी मार्ग : ८०

बातम्या आणखी आहेत...