आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहातात खराटा घेत स्वच्छता करत संत गाडगे महाराजांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला हाेता. याच पार्श्वभूमीवर संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त पालिकेच्या पंचवटी विभागातर्फे मंगळवारी (दि. २०) गोदावरी, वाघाडी नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. या माेहिमेच्या माध्यमातून तीन टन कचरा संकलित करण्यात आला.
संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीचे आैचित्य साधत पालिकेच्या वतीने या स्वच्छता माेहिमेचे आयाेजन करण्यात आले हाेते. पालिका आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांच्या आदेशाने व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलाेड यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका उपायुक्त विजयकुमार मुंढे, विभागीय अधिकारी कैलास राभडिया, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत बुरड डोह, हत्ती पूल, गणेशवाडी, संजयनगर, वाल्मीकीनगर, साबळेवाडा, ढिकलेनगरपर्यंत वाघाडी नदी व गोदावरी नदीच्या कन्नमवार पूल ते लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत नदीपात्राच्या काठावरील परिसर तसेच विभागातील सप्तरंग, मोरेमळा, शिवसमर्थनगर, दुर्गानगर, गोरक्षनगर, ओमकारनगर या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या माेहिमेत साधारणत: तीन टन प्लॅस्टिक व तत्सम कचरा संकलित करण्यात आला.
मलेरिया विभागामार्फत नदी परिसरात जंतूनाशकांची फवारणी करण्यात आली.तसेच प्रभागातील व बुरडवाडी, वाल्मीकनगर, गणेशवाडी, वाघाडी, ढिकलेनगर येथे राहणाऱ्या नागरिकांना नदीपात्रात कचरा न टाकता विलगीकरण करून घंटागाडीत देण्याबाबत व प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशवी न वापराबाबत जनजागृती करण्यात आली. विशेष स्वच्छता मोहिमेत स्वच्छता निरीक्षक दुर्गादास माळेकर, उदय वसावे, दीपक चव्हाण, किरण मारू, मुकादम बी. के. पवार, संजय मकवाना आदींसह त्यांचे सहा कर्मचारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे १५८ व वॉटरग्रेस प्राॅड्क्टसचे २३ स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. पालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता माेहिमेचे नागरिकांकडून काैतुक करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.